दिल्लीने मुंबईच्या तोंडचा घास काढून घेतला, हिटमॅन रोहितच्या संघाला सलामीलाच पराभवाचा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसऱया सामन्यात रोमहर्षक लढतीत दिल्ली कॅपिटल्सने माजी विजेत्या मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवून 15 व्या पर्वाची दणक्यात सुरुवात केली. दिल्लीचा अष्टपैलू ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी संयमी खेळी करत मुंबई इंडियन्सच्या तोंडचा घास काढून घेतला. ललितने 48, तर पटेलने 38 धावा करत दिल्लीच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

प्रथम नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी दणक्यात सुरुवात केली. रोहित आणि ईशान यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. रोहित 32 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरॉन पोलार्ड यांना मैदानावर तग धरता आला नाही. मात्र आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या ईशान किशन याने एक बाजू खंबीरपणे सांभाळून मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. ईशानने 48 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 81 धावा केल्या. ईशानच्या खेळीच्या जोरावर मुंबईला 20 षटकांमध्ये 177 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव याने अनुभवाचा वापर करून उत्तम गोलंदाजी करत चार षटकांत अवघ्या 18 धावा देत मुंबईच्या 3 विकेट घेतल्या, तर खलील एहमद याने 2 विकेट घेतल्या.

मुंबईने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. दिल्लीचा सलामीवर टीम शेफर्ट 21 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मनदीप सिंग शून्यावर बाद झाला. तर ऋषभ पंत अवघी एक धाव करून बाद झाल्यामुळे दिल्लीचा डाव कोलमडला होता. पंत बाद झाला तेव्हा दिल्लीची 3 बाद 32 अशी अवस्था झाली होती. सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूंत 38 धावा करत कडवी झुंज दिली. शॉला बाद करून मुंबईने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. त्यानंतर ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी मोर्चा सांभाळत संयमी खेळ केला. ललित यादव याने 38 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या, तर अक्षरने 17 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 38 धावा करत ललितला मोलाची साथ दिली. दोघांच्या संयमी खेळीमुळे दिल्लीने 10 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला.

ईशानची 81 धावांची धडाकेबाज खेळी व्यर्थ
आयपीएलच्या लिलावामध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुंबईने त्याला 15 कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजून संघात सामील करून घेतले होते. पहिल्या सामन्यात किशनने मुंबईने त्याच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवला. ईशानने 48 चेंडूंत 81 धावांची तडाखेबाज खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले, मात्र ईशानची ही तुफानी खेळी मुंबईच्या सलामीच्या अपयशामुळे व्यर्थ ठरली.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स ः 20 षटकांत 5 बाद 177 (रोहित शर्मा 41, ईशान किशन नाबाद 81, तिळक वर्मा 22,टीम डेव्हिड 12 ,खलील अहमद 27 धावांत 2 विकेट. कुलदीप यादव 18 धावांत 3 विकेट) पराभूत वि दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ 38, टीम शेफर्ट 21, ललित यादव नाबाद 48, अक्षर पटेल नाबाद 38; बसिल थंपी 35 धावांत 3 विकेट, मुरुगन अश्विन 14 धावांत 2 विकेट, टायमल मिल्स 26 धावांत 1 विकेट).