
सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासाठीची दुसरी यादी जाहीर करताना चार विद्यमान खासदारांना जबरदस्त धक्का दिला आहे. पहिल्या यादीत लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचे तिकीट कापल्यानंतर भाजपश्रेष्ठींनी दुसऱया यादीत तब्बल चार खासदारांना घरी बसविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. दुसरीकडे काँग्रेसने तिसरी यादी जाहीर करताना अनपेक्षित नावांना पसंती दिल्याने काँग्रेसमधील गोंधळ पुढे आला आहे.
पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्या निक्रियतेमुळे त्यांना नारळ मिळणे अपेक्षितच होते. शिरोळेंच्या जागी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपने संधी दिली आहे. सोलापूरचे खासदार शरद बनसोडेंचे तिकीट कापून जंगम समाजात मोठे आध्यात्मिक स्थान असलेल्या जयसिद्धेश्वर स्वामी यांना सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात भाजपने मैदानात उतरवले आहे. जळगावात एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या वादाचे बळी ए. टी. नाना पाटील ठरले आहेत. खडसेंच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून ए. टी. नानांचे तिकीट कापून आपले समर्थक आमदार स्मिता वाघ यांना संधी दिली आहे. दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापण्यातही गिरीश महाजन यशस्वी ठरले. त्यांच्याऐवजी अवघ्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपने संधी दिली आहे. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पवार घराण्याच्याच नातेवाईक असलेल्या कांचन कुल यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. कांचन या रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी प्रताप पाटील-चिखलीकर यांना भाजपने मैदानात उतरवले आहे.
गोव्यातून श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून भाजपविरोधात बंड करणारे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचे पुत्र, केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना झारखंडमधील हजारीबाग मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत 286 उमेदवारांची घोषणा केली आहे. उत्तर गोवा मतदारसंघातून श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्यातून ऍड. नरेंद्र सावईकर, मध्य प्रदेशातील मुरैनामधून नरेंद्रसिंह तोमर, हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमधून अनुराग ठाकूर यांनाही पक्षाने तिकीट दिले आहे.
काँग्रेसच्या यादीत अनपेक्षित चेहरे
आगामी लोकसभेसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात अनेक अनपेक्षित नावे असल्याने काँग्रेस वर्तुळात चांगलाच गोंधळ उडाला आहे. संभाजीनगरमधून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे काँग्रेसकडून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा असतानाच अचानकपणे सुभाष झांबड या तुलनेने कमी तुल्यबळ उमेदवारास काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. तीच बाब चंद्रपूरची. येथून विनायक बंगाडे या नवख्या उमेदवारास लॉटरी लागली आहे. जालन्यातून काँग्रेसने विलास औताडे यांना मैदानात उतरवले आहे, तर भिवंडीतून माजी खासदार सुरेश टावरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. लातूरमधून मच्छिंद्र कामत या फारशा परिचित नसलेल्या नेत्याला काँग्रेसने संधी दिली आहे.




























































