Delhi Bomb Threat- CRPF च्या शाळा आणि जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबई, बिहार यांसारख्या इतर राज्यांत पोलीस आणि तपास यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. दरम्यान, आज दिल्लीतील 2 CRPF आणि 3 जिल्हा न्यायालयांना बॉम्ब ठेवण्यात आल्याचा मेल आला. यामध्ये साकेत कोर्ट आणि पतियाळा हाऊस कोर्ट यांचा समावेश आहे. या धमकीमुळे दिल्लीकरांमध्ये पुन्हा एकदा घबराट पसरली आहे.

दिल्लीतील दोन सीआरपीएफ शाळांना आज पहिला धमकीचा फोन आला. पीसीआर कॉलवर आलेल्या या फोनमध्ये द्वारका येथील सीआरपीएफ शाळेत आणि प्रशांत विहार येथील सीआरपीएफ शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. याशिवाय दिल्लीतील तीन जिल्हा न्यायालयांनाही बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. या न्यायालयांना मेलद्वारे धमकी देण्यात आली.

धमकीचा मेल मिळाल्यानंतर साकेत न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसेच पतियाळा हाऊस न्यायालयातही चौकशी सुरू आहे. न्यायालयाचे कामकाज थांबवण्यात आले असून सगळ्यांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुढील दोन तासांसाठी सर्व न्यायालयीन कामकाज थांबवण्यात आले आहे. तसेच दिल्ली पोलीस आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी आमिर रशीद अली याला सोमवारी पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर अवघ्या 24 तासांतच बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने संपूर्ण कोर्ट परिसरात चौकशी सुरू झाली.