
आधारभूत किंमत कायदा आणि विविध मागण्यांसाठी दिल्ली चलो आंदोलनाच्या आजच्या तिसऱया दिवशी शेतकऱयांनी पंजाबमध्ये विविध ठिकाणी ‘रेल रोको’ आंदोलन केले. मोठय़ा संख्येने शेतकऱयांनी रेल्वे रुळावरच ठिय्या दिला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला अनेक रेल्वे गाडय़ांचे मार्ग बदलावे लागले. अनेक ठिकाणी टोलनाकेही अडवून धरले. या टोलनाक्यांवरून टोल न घेता गाडय़ा सोडण्यासाठी शेतकऱयांनी टोल प्रशासनावर दबाव आणला. त्यामुळे टोलनाक्यांवर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि शेतकऱयांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.
भाजप हे केंद्रात रावणाचे सरकार चालवत आहे. रावणाने जशी लक्ष्मण रेषा पार केली होती त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
पंतप्रधानांनी माफी मागावी – काँग्रेस
शेतकऱयांशी खोटे बोलणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी तसेच देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली आहे. काँग्रेसच्या शेतकरी न्याय गॅरंटीच्या माध्यमातूनच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी होऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे. 2011 मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना शेतकऱ्यांबद्दलचा एक अहवाल सोपवला होता. त्यात एमएसपी कायदा आणायला हवा असे म्हटले होते. 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मोदी यांनी एमएसपी कायद्याबद्दल आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत आश्वासने आजपर्यंत पूर्ण केलेली नाहीत, याची आठवणही जयराम रमेश यांनी करून दिली.



























































