
दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. बहुतेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४०० पेक्षा जास्त झाला आहे, जो गंभीर श्रेणीत येतो. यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि प्रदूषणाशी संबंधित आरोग्य संकट आणखी बिकट होत आहे. यातच रविवारी प्रदूषणाविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले. आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांचे नेतेही या निषेधात सामील झाले. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी सरकारने ठोस आणि प्रभावी धोरणे आखावीत, अशी मागणी करत त्यांनी इंडिया गेटकडे मोर्चा काढला.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी निदर्शकांना रोखले, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंडिया गेट हे निदर्शन स्थळ नाही. याबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजधानीत निदर्शनांसाठी फक्त जंतरमंतर हे अधिकृत ठिकाण आहे. म्हणून पोलिसांनी लोकांना जंतरमंतरकडे जाण्यास सांगितले आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक निदर्शकांना ताब्यात घेतले.





























































