…तर अरविंद केजरीवाल यांना CBI-ED दोन दिवसात अटक करणार, ‘आप’चा दावा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये युतीच्या चर्चा सुरू आहेत. मात्र यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता पसरली असून आप-काँग्रेस युती झाल्यास केजरीवाल यांना अटक करू अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी केला.

इंडिया आघाडीच्या एकजुटीची भारतीय जनता पक्ष आणि मोदींना भीती वाटत आहे. इंडिया आघाडीचे जागावाटप फायनल झाल्याच्या बातम्या आल्यापासून आपच्या नेत्यांना त्यांना इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसात सीबीआयच्या सीआरपीसी कलम 41 ए ची नोटीस पाठवली जाईल आणि त्यानंतर सीबीआय-ईडी त्यांना अटक करेन, अशी धमकी दिली जात आहे, असा दावा आतिशी यांनी केला.

भाजपच्या या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आपच्या सर्व नेत्यांना आणि आमदारांना तुरुंगात टाकले तर आपचा एक-एक कार्यकर्ता मैदानात उतरेल आणि देशाच्या लोकशाहीचे, संविधानाचे रक्षण करेल, असेही आतिशी म्हणाल्या. तसेच केजरीवाल यांना अटक केली तर काँग्रेससोबत युती होणारच असेही त्या म्हणाल्या. शुक्रवारी सकाळी आपचे राज्यसभा खासदार संदीप पाठक, मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.