मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना भेटणार, आज दिल्लीत महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा

964

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या गुरुवारी दिल्ली दौऱयावर जात असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा करतील. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आणि ते पंतप्रधानांची भेट घेणार असल्याने या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आणि राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर अयोध्येत राममंदिर न्यासाची स्थापना करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनीही स्वागत केले होते. याआधी पुणे येथील पोलीस महासंचालकांच्या परिषदेला पंतप्रधान मोदी आले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुणे विमानतळावर स्वागत केले होते.

मुख्यमंत्री ठाकरे उद्या दिल्लीत जाणार असून ते पंतप्रधानांची खास भेट घेणार आहेत. राज्याच्या जीएसटीचा केंद्र सरकारकडे असलेला परतावा तसेच अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 7200 कोटी आणि कोल्हापूर-सांगली महापुराचा मदतनिधी म्हणून 6800 कोटी रुपये केंद्राकडून येणे प्रलंबित आहे. यासह राज्याच्या विविध प्रश्नांबाबतही मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी, लालकृष्ण आडवाणी यांचीही सदिच्छा भेट घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार आहेतच, पण या दौऱयात ते काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचीही सदिच्छा भेट घेतील.

आपली प्रतिक्रिया द्या