दिल्लीत कोरोनाचा कहर… मास्कशिवाय आढळल्यास दोन हजार रुपये दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकारसोबत केंद्रानेही याचा धसका घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यापुढे दिल्लीत मास्कशिवाय आढळल्यास दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

दिल्लीतील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर केजरीवाल यांनी मास्कचा वापर न करणाऱयांना दोन हजार रुपये दंड आकारण्याची घोषणा केली. मास्क न वापरणाऱयांना दिल्लीत यापूर्वी 500 रुपये दंड आकारला जात होता, मात्र तरीही अनेक लोक मास्कचा वापर करत नव्हते. यामुळे आम्ही दंडाची रक्कम आता दोन हजार रुपये एवढी केली असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील सर्व खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रकारच्या नॉन-क्रिटिकल प्लॅण्ड सर्जरी टाळण्यात याव्यात असे सांगण्यात आले आहे. दिल्ली सरकारकडून 663 आयसीयू बेडची, तर केंद्र सरकारकडून 750 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली.

दिल्लीतील नागरिकांना वाचविण्यासाठी केंद्राचे प्रयत्न
दिल्लीत करोना संक्रमणाची तिसरी लाट सुरू असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. दिल्लीत बुधवारी 100 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारकडूनही दिल्लीतील नागरीकांना कोरोना संकटातून वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा स्वतः यामध्ये लक्ष घालत असून इतर राज्यांच्या पॅरामेडिकल स्टाफला दिल्लीला बोलावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत