‘न्यूजक्लिक’ च्या संपादकांची तातडीने मुक्तता करा, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

‘न्यूजक्लिक’ चे संपादक प्रबीर पूरकायस्थ यांना देशद्रोह प्रकरणात (UAPA) सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची तातडीने मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठाने निर्णय दिला. UAPA अंतर्गत अटक आणि कोठडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर सवाल

‘न्यूजक्लिक’ वेब पोर्टलचे संपादक पूरकायस्थ यांना अटक केल्यानंतर त्यांच्या वकिलांना न कळवता त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर घाईघाईत हजर करण्यात आले होते. यामुळे दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला जात होता. पूरकायस्थ यांच्या वकिलांना कोठडीचा अर्ज देण्यापूर्वीच कोठडीचा आदेश जारी करण्यात आला होता. यावर न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानेही चिंता व्यक्त केली. पोलिसांनी पूरकायस्थ यांच्या वकिलांना का कळवले नाही? असा सवाल विचार सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. दिल्ली पोलिसांच्या बाजूने ASG एसव्ही राजू यांनी तर्क देत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाने तो मानन्यास नकार दिला. पूरकायस्थ यांच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

कथित चिनी फंडिंग प्रकरणात केली होती अटक

पोर्टलच्या माध्यमातून देश विरोधात प्रचाराला चालना देण्यासाठी कथित चिनी फंडिंग प्रकरणात पूरकायस्थ यांना गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर 2023 ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते.