
>> नीलेश कुलकर्णी
आपल्या स्वभावानुसार लालूप्रसाद यादव यांनी अखेर आपले धाकटे चिरंजीव तेजस्वी यांना ‘यशस्वी भवं’ म्हणत राजकीय उत्तराधिकारी म्हणून आशीर्वाद दिला आहे. अर्थात त्यामुळे लालूंच्या कुटुंबातील ‘यादवी’ संपुष्टात येईल की भविष्यात विदारक वळण घेईल, हे येणारा काळच ठरवेल. जन्मभर समाजवादाची जपमाळ करत सत्ता फक्त कुटुंबकबिल्यापुरती व पाव्हण्या रावळ्यांपुरती राबवली की त्याचा शेवट कसा होतो, हे लालूंच्या सद्यस्थितीवरून दिसून येते. पक्षात शून्य स्थान राहिलेल्या तेजप्रतापांनी बंडाची उसळी मारली तर, लालू परिवारातील यादवी अटळ आहे आणि त्याचा आपसूकच परिणाम बिहारच्या राजकारणावर होणार आहे.
लालूप्रसाद यादव यांना दिल्लीत नजरकैदेत ठेवले आहे, असा आरोप त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांनी केला होता. या तथाकथित बंदिवासातून लालू पाटण्यात आले. मात्र तेजप्रताप यांना त्यांचे दर्शन घेण्यासाठीही रस्त्यावर आंदोलन करावे लागले. अखेरीस लालूंनी तेजप्रताप यांना दर्शन दिले. त्यांना राबडीदेवीसमवेत जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाचे फोटो वगैरेही दाखविले. या तिघांनी एकत्रित सेल्फी वगैरेही घेतला. यावेळी तेजप्रताप यांनी लालूंची पाद्यपूजा केली. मात्र एवढे करूनही लालूंनी ‘राजकीय आशीर्वाद’ तेजस्वी यांनाच दिल्याने आता तेजप्रताप लालू आदेश गपगुमान मान्य करतात की त्याविरोधात बंड करतात हे पाहावे लागेल. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंदसिंग हे ‘कंस’ असल्याची उपमा देत तेजप्रतापांनी कुटुंबकहल आणि पक्षकलहाच्या महाभारताला जगदानंदसिंग यांना जबाबदार ठरवले आहे, तर दुसरीकडे लालू यादवांनी भाजप घराघरांत भांडणे लावत असल्याचा आरोप केला आहे. राजकीय टीका म्हणून हे सगळे ठीक असले तरी, भाजपने घर फोडल्याचा आरोप करण्यापेक्षा लालू यांनी आपले घर नीटनेटके सांभाळायला हवे.
लालू यादवांनी आपला राजकीय उत्तराधिकारी तेजस्वी यादव यांना घोषित करून ‘लालू के बाद कौन?’ या एका प्रश्नापासून सर्वांचीच सुटका केली आहे. मात्र ही सुटका झाली असली तरी यापुढे त्यांना अनेक प्रश्नांच्या मालिकेला सामोरे जावे लागणार आहे. लालू, तेजस्वी विरुद्ध तेजप्रताप, राबडीदेवी, मीसा भारती अशी मतभेदाची दरी यादव कुटुंबात निर्माण झाली आहे. राजकीय उत्तराधिकारीपदाचा निर्णय झाला असला तरी, ही दरी बुजण्याची शक्यता कमीच आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेजस्वी व तेजप्रताप या लालूंच्या दोन्ही तरुण चिरंजीवांना असलेली राजकीय महत्त्वाकांक्षा. बरे ही महत्त्वाकांक्षा या दोघांपुरतीही मर्यादित नाही. लालूंचा कुटुंबकबिला तसा मोठाच. त्यातील जवळपास प्रत्येकाला राजकारणात सत्तास्थान हवे आहे. ‘गरीब, पिछडा, दलित’ यांच्या नावाने मते मागणाऱया लालूंवर हा काळाने उगवलेला सूड आहे, असेच म्हणावे लागेल. मुळातच नितीशकुमारांच्या मुरब्बी व मतलबी राजकारणामुळे राष्ट्रीय जनता दल बिहारच्या राजकारणातही दिवसेंदिवस अप्रासंगिक बनत चालला आहे. त्यात लालू इतके दिवस तुरुंगात असल्याने पक्ष दिशाहीन होता. लालू बाहेर आले तर त्यांना पहिल्यांदा कुटुंबकलह सोडवावा लागला. लालूंचा करिश्मा अजूनही कायम असला तरी, लालूंची गाडी राजकीय उतरणीला लागली आहे. बिहारमध्ये या पक्षाची ‘स्पेस’ भाजपने ‘यादव कार्ड’ खेळून हुशारीने भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोबतीला छोटे मोठे पक्ष उदयाला येत आहेत. रामविलास पासवान यांच्यानंतर लोकजनशक्ती पक्षाची झालेली वाताहत सर्वांनीच पाहिली आहे. लालूंवर हयातीतच पक्षाची घसरण पाहण्याची वेळ आली आहे. लालूंनी उत्तराधिकारी नेमून प्रश्न सोडवला की वाढवला, हे कोडेच आहे. तेजस्वी यांचे नेतृत्व तेजप्रताप कधीच मान्य करणार नाहीत. या पार्श्वभूमीवर ते भाजपचे कमळ हातात घेतात की नवा एखादा पक्ष काढतात हे पाहावे लागेल.
येडियुरप्पांचा ‘जलवा’
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांना पंचाहत्तरीचे कारण सांगून दिल्लीकर मंडळींनी कर्नाटकात मार्गदर्शक मंडळात पाठवले असले तरी, ‘अभी तो मै जवान हूं’ असा प्रत्यय दिल्लीकरांसहित कर्नाटकातील भाजप नेत्यांना येडियुरप्पांनी दाखविला आहे. येडियुरप्पा हे नाकापेक्षा मोती जड आहेत, आपल्याला जुमानत नाहीत, हे लक्षात घेऊन भाजपश्रेष्ठाRनी त्यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी केली. भाजपात आयात करण्यात आलेले लिंगायत नेते बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवले. मात्र 78 वर्षांचे येडियुरप्पा हेच कर्नाटकातील भाजपचे सर्वोच्च नेते आहेत, याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत आला आहे. कर्नाटकातील सिंदगी आणि हनगल मतदारसंघात भाजपची चांगलीच दमछाक झाली. त्यातल्या त्यात हनगल हा मुख्यमंत्री बोम्मईंच्या जिल्हय़ातील मतदारसंघ. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली. जिल्हय़ातील मतदारसंघ असूनही मुख्यमंत्र्यांच्या सभेला तुरळक गर्दी जमायला लागल्यानंतर भाजपचे धाबे दणाणले. त्यानंतर ‘मार्गदर्शक मंडळा’तून येडियुरप्पांना बाहेर काढण्यात आले. राजकीय रंगमंचावर येडियुरप्पा पुन्हा प्रकटल्यावर हनगल व सिंदगीमध्ये भाजपची हवा तयार झाली. त्यामुळे भाजपचा जीव भांडय़ात पडला असला तरी निकालाचाही उत्सुकता आहेच. कधीकाळी सायकलवर प्रवास करून येडियुरप्पा यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकात कमळ फुलविले होते. सत्ता येताच काही बऱयावाईट गोष्टी राजकीय नेत्याला चिकटतात. त्याला येडियुरप्पा तरी कसे अपवाद ठरतील? मात्र भ्रष्टाचाराचा शिक्का मारूनही येडियुरप्पा कर्नाटकाच्या राजकारणातून बेदखल झाले नाहीत याची दिल्लीकरांना दखल घ्यावी लागेल. येडियुरप्पांचा ‘जलवा’ कायम राहिला तर दिल्लीकरांची कोंडी होणार आहे हे नक्की.
भाडेतत्त्वावरची ‘राजकीय अक्कल’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा कान उपटूनही बेताल बोलण्याची भाजप पुढाऱयांची मोहीम काही थांबता थांबलेली नाही. देशातील महत्त्वाच्या व मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष इकडे तिकडे वळविण्यासाठी तर ही बेताल मोहीम नाही ना? अशी शंका येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाचा कारभार भाजपचे दोन सर्वोच्च नेते चालवत असल्याने इतर मंडळी तशी रिकामटेकडीच आहे. त्यामुळे ‘उचलली जीभ आणि लावली टाळय़ाला’ असे करत ती अकलेचे तारे तोडत असतात. त्यात आता भर पडली आहे ती रुची पाठक नावाच्या भाजयुमोच्या पदाधिकाऱयाची. या युवा महिला नेत्याने आपल्या विलक्षण बुद्धीचा प्रत्यय जगाला करून दिला तो असा की, हिंदुस्थान हा आपला देश 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वतंत्र झाला आहे, असा भलामोठा जावईशोध या विदुषींनी लावला आहे. एकीकडे पंतप्रधानांपासून संर्प्णू जनता देशाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना, देशाचे स्वातंत्र्य केवळ 99 वर्षांपुरतेच आहे, याची जाणीव या रुची यांनी देशवासीयांना करून दिली. हल्ली चॅनेलवरच्या चर्चांमध्ये अशा फुटकळ लोकांना अकलेचे तारे तोडायची संधी मिळते. झाशी येथील कार्यक्रमात काँग्रेसच्या एका पुढाऱयाने खासगीकरणावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर, रुची पाठक यांनी, काँग्रेसने देशाचे स्वातंत्र्य 99 वर्षांच्या ‘लीज’वर घेतल्याचे सांगत, आपला देश अजून पूर्णपणे स्वतंत्र नाही ‘कॉन्ट्रक्ट बेसिस’वरचे हे स्वातंत्र्य आहे, असे अगाध ज्ञान पाजळल्यानंतर रुची यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.





























































