दिल्ली डायरी – भाजपमध्ये बंडखोरीचा ‘वसंत’!

>> नीलेश कुलकर्णी , [email protected]

लोकसभा निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असताना भारतीय जनता पक्षात सध्या बंडखोरीचा ‘वसंत’ बहरला आहे. ईडी, सीबीआय, दिल्लीकरांच्या दहशतीला न जुमानता भाजपमधील बंडखोरीला नवी पालवी फुटली आहे. भाजपने इतर पक्षांतले लोक आणल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केडरही अनेक जागी तटस्थपणाच्या भूमिकेत आहेत. कर्नाटक, राजस्थान, हरयाणासह बिहारमध्ये अनेक भाजप नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने पक्ष व सरकार चालविणे फार काळ खपवून घेतले जात नाही हाच धडा या बंडाच्या वसंत ऋतूने भाजपश्रेष्ठीना मिळत आहे.

भाजपमधील निष्ठावंत गेल्या दहा वर्षांत इतके डावलले गेले आहेत की, ‘उरलो फक्त आयातांच्या सतरंज्या उचलण्यापुरते,’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीने निष्ठावंतांना त्या काsंडीतून सुटका करून घेण्याचा पर्याय सापडला आहे. संघाचे निष्ठावंत अनेक ठिकाणी निवडणुकीपासून अलिप्त आहेत, तर अन्य ठिकाणी भाजपमधील निष्ठावंतांनी ईडी, सीबीआयला फाटय़ावर मारत बंडाचे निशाण फडकवले आहे. कर्नाटकाचे माजी उपमुख्यमंत्री ईश्वरप्पा यांनी येडियुरप्पांचे खासदार चिरंजीव राघवेंद्र यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवून भाजपच्या नाकीनऊ आणले आहे. बंडखोर ईश्वरप्पांना दमबाजी करण्यासाठी अमित शहांकडून दिल्लीत भेटीसाठी बोलावणे आले. ईश्वरप्पा भेटीसाठी गेले. मात्र ही पूर्वनियोजित भेट न झाल्यामुळे तसेच माघारी परतले. अमित शहा यांचाच माझ्या बंडखोरीला आशीर्वाद आहे, असा उफराटा प्रचार करीत आहेत. कर्नाटकचेच बसनगौडा पाटील यतनाळही बंडखोरीच्या मूडमध्ये आहेत. बिहारमध्ये अजय निशाद, छेदी पासवान या विद्यमान खासदारांची तिकिटे कापल्यानंतर त्यांनी बंडाचे निशाण फडकवत भाजपला अद्दल घडविण्याची भाषा केली आहे. अश्विनीकुमार चौबे यांचे तिकीट कापल्याने बिहारमधला ब्राह्मणांचा वर्ग नाराज झाला असून भाजपला अद्दल घडविण्याचा विडा चौबे समर्थकांनी उचलला आहे. ज्येष्ठ महिला खासदार रमा देवी यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक व वैश्य समाज क्षुब्ध झाला आहे. रमा देवींनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकावले नसले तरी त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. हरयाणात वीरेंद्र सिंह यांच्या खासदार चिरंजीवांनी काँगेसमध्ये प्रवेश केला, तर राजस्थानमध्ये भाजपचे खासदार राहुल कस्वा यांनी काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. ‘चारसौ पार’चा नारा देणे सोपे आहे. मात्र बंडखोरीचा हा ‘वसंत ऋतू’ दिल्लीतील स्वयंघोषित चाणक्यांना घाम पह्डणारा आहे.

पंजाबमध्ये ‘काँगेसयुक्त’ भाजप

‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. त्या वेळी नेहमीप्रमाणे त्यांच्या भक्तमंडळाला भलत्यात आनंदाच्या उकळय़ा वगैरे फुटल्या होत्या. मात्र ‘काँगेसमुक्त भारत’ अशी घोषणा देता देता भाजपच स्वतः कधी ‘काँगेसयुक्त’ झाला हे भक्तमंडळालाही कळले नाही. पंजाबात अकाली दलाने विश्वासघाताचा पूर्वानुभव लक्षात घेऊन भाजपने पुढे केलेला दोस्तीचा हात सपशेल झिडकारला. त्यामुळे पंजाबात राजकीयदृष्टय़ा जिवंत कसे राहायचे, असा प्रश्न गेल्या वेळी अकाली दलाच्या टेकूवर चार खासदार निवडून आलेल्या व नऊ टक्के मते मिळवलेल्या भाजपला पडला होता. तो प्रश्न काँगेसच्या मातब्बर नेत्यांनी सोडवला आहे. गेल्या 70 वर्षांत भाजपला पंजाबात केडर उभारता आले नाही त्याचाच हा पुरावा मानावा लागेल. पॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यापासून भाजपने आयातीला सुरुवात केली, ती अजूनही सुरूच आहे. दिग्गज काँगेसी नेते बलराम जाखडांचे कट्टर काँगेसी सुपुत्र सुनील जाखड सध्या भाजपचे तिकडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या कार्यकारिणीत जुन्या काँगेसजनांचा भरणा केला आहे. फेतहसिंह बाजवा (काँगेस नेते प्रताप बाजवा यांचे भाऊ), हरज्योत कमल, अरविंद खन्ना, केवल ढिल्लो यांचा समावेश आहे, तर कोअर कमिटीमध्ये मनप्रीत बादल, राणा गुरमीत सिंग या काँग्रेसी नेत्यांचा समावेश आहे. रवनीत बिट्टू या विद्यमान खासदारांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाब भाजपची सध्याची अवस्था म्हणजे ‘काँगेसच्या जुन्या बाटलीत भाजपची नवी दारू’ अशी झाली आहे.

‘आप’चे ‘लापता’ खासदार!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केल्यापासून आप या पक्षासाठी ही लढाई निर्णायक बनली आहे. केजरीवालांच्या पत्नी सुनीता या लढाईत धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आहेत. दिल्लीतल्या मंत्री अतिशी यादेखील आपल्या परीने पेंद्रीय यंत्रणांच्या जुलमी कारवायांविरोधात जनमत जागृत करत आहेत. जामिनावर बाहेर आलेले खासदार संजय सिंग लढत आहेत. मात्र अरविंद केजरीवालांच्या मेहरबानीमुळे राज्यसभेवर निवडून आलेले राज्यसभेचे इतर खासदार या निर्वाणीच्या प्रसंगी आहेत तरी कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. केजरीवालांचे खासम्खास मानले जाणारे राघव चढ्ढा डोळय़ांचे ऑपरेशनचे कारण सांगून विदेशातच रेंगाळले आहेत. राज्यसभेवर नुकत्याच नियुक्त झालेल्या स्वाती मालीवालदेखील बहिणीच्या आजारपणाचे कारण सांगून अमेरिकेत आहेत. आपचे कोषाध्यक्ष एन.डी. गुप्ता दिल्लीत असूनही आपच्या कोणत्याही आंदोलनात दिसलेले नाहीत. केजरीवालांनी पक्षासाठी कोणतेही योगदान नसताना अचानकपणे राज्यसभेवर पाठविलेले क्रिकेटपटू हरभजन सिंग तर कुठेच दिसत नाहीत. पंजाब विद्यापीठाच्या एका माजी कुलगुरूंनादेखील केजरीवालांनी राज्यसभेवर पाठविले आहे. हे गृहस्थही गायब आहेत. आपच्या आंदोलनात व प्रचारांत ही मंडळी कुठेच दिसत नाहीत. ईडी व सीबीआयच्या भीतीने केजरीवालांचे हे खासदार बिळात लपून बसल्याची टीका आता पक्षातूनच होते आहे. अशा आयात लोकांऐवजी पक्षात काम करणाऱया कार्यकर्त्यांनाच राज्यसभा दिली असती तर असा विचार कदाचित केजरीवालही आजची ही स्थिती पाहून करत असतील. तृणमूल काँगेसने निवडणूक आयोगाविरोधात नुकतेच दिल्लीत आंदोलन केले. लोकसभेचे खासदार निवडणुकीत व्यस्त असल्याने पक्षाचे राज्यसभेचे डेरेक ओब्रायनपासून ते नवनियुक्त खासदार सागरिका घोष यांच्यापर्यंत सर्वच खासदार दिल्लीतल्या रणरणत्या उन्हात दिवसभर आंदोलन करत होते. पोलिसांसोबत या खासदारांची छोटी झटापटही झाली. मात्र तृणमूलने आंदोलन मागे घेतले नाही. पक्षनिष्ठा कशी असावी हे तृणमूलच्या या खासदारांकडून आपच्या ऐनवेळी ‘लापतागंज’ गाठलेल्या खासदारांनी शिकायला हवी.