दिल्ली डायरी : उत्तर प्रदेशातील ‘अंदाज अपना अपना’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

मोदी सरकारचा ग्राफ सध्या घसरला आहे. साहजिकच वैचारिक व कोणत्याही सिद्धांताशिवाय भाजपप्रणीत एनडीएला चिकटलेले घटक पक्ष बदलत्या वाऱयाचा अंदाज घेऊन बाहेर उडय़ा मारत आहेत. उत्तर प्रदेशमधल्या अपना दलसारख्या छोटय़ा पक्षानेही एनडीएतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आधीच भाजपची वाट बिकट झाली आहे. त्यामुळे शिवपाल यादव यांच्याप्रमाणेच अनुप्रिया पटेलांचा अपना दल, ओमप्रकाश राजभर, राजाभैयांचा पक्ष पीस पार्टी, राष्ट्रीय उलेमा कौन्सिल, एमआयएम यांसारख्या पक्षांना अनन्यसाधारण असे महत्त्व वगैरे प्राप्त झाले आहे. उत्तर प्रदेशातील या ‘अंदाज अपना अपना’चा फायदा-तोटा कोणाला किती होतो हे प्रत्यक्ष निवडणुकीनंतरच कळेल.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. दोन वर्षांपूर्वी जो भाजप ‘‘आम्ही 2019 नव्हे, तर 2024 च्या निवडणुकीची तयारी करीत आहोत’’ असे सांगत होता, तो भाजप आता बदललेल्या वातावरणामुळे जमिनीवर आला आहे. अर्थात देशातील राजकारणाचे वारे वेगळय़ा पद्धतीने वाहू लागल्याने भारतीय जनता पक्ष आता भानावर आला असला तरी सत्ताधारी एनडीएतील अनेक घटक पक्ष मात्र या बुडत्या जहाजातून बाहेर पडण्याची धडपड करीत आहेत. उत्तर प्रदेशातील अपना दलसारख्या पक्षानेही आता एनडीएतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारामुळे भाजपची त्या प्रदेशातील वाट आधीच बिकट झाली आहे. पुन्हा पंतप्रधानपदाचा मार्ग हा लखनौवरून जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशातील किडूकमिडूक पक्षांनाही आता ‘राष्ट्रीय महत्त्व’ प्राप्त झाले आहे. मुलायमसिंग यांचे नाराज बंधू शिवपाल यांचा प्रगतशील समाजवादी पक्ष ‘बुआ भतीजा’ युतीला कितपत खिंडार पाडू शकतो यावर भाजपचे त्या राज्यातील यश अवलंबून आहे. भाजपला अशी कसरत करावी लागत असल्याने शिवपाल यादव यांच्याप्रमाणेच अनुप्रिया पटेलांचा अपना दल, ओमप्रकाश राजभर, राजाभैयांचा पक्ष पीस पार्टी, राष्ट्रीय उलेमा कौन्सिल, एमआयएम या छोटय़ा पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपसाठी हा ‘काव्यगत न्याय’ मानावा लागेल.

उत्तर प्रदेशातील अपना दलचे नेते आशीष पटेल यांनी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यामुळे तेथील राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या वेळी दिग्विजय मिळालेल्या उत्तर प्रदेशात भाजपची अवस्था ‘इंच इंच लढवू’ अशी झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी स्वपक्षातून आई आणि बहिणीला बाहेरचा रस्ता दाखविणाऱया व मोदी सरकारमध्ये आरोग्य खात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळणाऱया अनुप्रिया पटेल यांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अनुप्रिया यांनी साथ सोडण्याचे संकेत दिल्यामुळे अनुप्रिया यांना ‘पटेल’ असा फार्म्युला देण्याचा भाजप श्रेष्ठाRचा इरादा आहे. समाजवादी पार्टी व बसपातील आघाडीबरोबरच प्रियंका गांधींच्या राजकारण प्रवेशाने उत्तर प्रदेशात भाजपला फटका बसेल असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे तिथे भाजप नेतृत्व मोठय़ा प्रमाणावर ‘डॅमेज कंट्रोल’ करीत आहे. सपा-बसपा युतीला पंक्चर करण्यासाठी शिवपाल यादव यांना सत्तेचा डोस दिला गेला आहे. मात्र शिवपाल भाजपच्या मदतीसाठी अप्रत्यक्षपणे तत्पर असले तरी ऍट्रॉसिटीच्या मुद्दय़ावरून राजाभैयांनी काढलेला पक्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर गेली पाच वर्षे ज्या पक्षांची नावेही जनतेला माहीत नव्हती त्यांना कधी नव्हे ते ‘अच्छे दिन’ प्राप्त झाले आहेत. राजकारण हे प्रवाही असते आणि त्याचाही आपला एक ‘अंदाज अपना अपना’ असतो हेच खरे !

एक बंगला लगे प्यारा…!
खुर्ची गेली तरी राजकीय नेत्यांचे खुर्चीवरचे आणि सरकारी बंगल्यावरचे प्रेम तसूभरही कमी होत नाही. आपल्या देशात नेतेमंडळींचे हे खुर्ची व बंगल्यावरचे ‘व्हॅलेंटाइन’ बारमाही असते. त्यामुळेच दिवंगत पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या चिरंजीवांचा म्हणजे अजितसिंग यांचा सरकारी बंगला दिल्ली पोलिसांना पोलीस बळाचा वापर करून रिकामा करावा लागला होता. हा किस्सा फारसा जुना झालेला नसताना बिहारच्या कोर्टाने राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. जीतनराम मांझी यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यावेळी पुन्हा मुख्यमंत्रीपद काबीज केलेल्या नितीशबाबू व जीतनराम यांच्यात मुख्यमंत्री बंगल्यातील आंब्याच्या झाडांवरून झालेली जुगलबंदी त्यावेळी चांगलीच गाजली होती. लालूप्रसाद यादव यांच्यासारखी मंडळी रात्रंदिवस समाजवादाचा, जेपी झिंदाबाद आणि लोहियांचा नारा देत असली तरी त्यांनी आपला समाजवाद केवळ आपल्या कुटुंबाच्या सत्तेपुरताच राबवला आहे. त्यामुळे बिहारसारख्या गरीब राज्यात पाटणा या एकाच शहरात लालू यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी आणि त्यांचे माजी उपमुख्यमंत्री चिरंजीव तेजस्वी हे तिघे तीन आलिशान बंगल्यात सरकारी सुविधा फुकटात लाटत होते. मात्र न्यायालयाने ही तरतरी आता उतरवली आहे. चारा घोटाळय़ातून सुटलेले माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांनाही चंबूगबाळे आवरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सगळय़ात गमतीचा भाग म्हणजे बिहारच्या राजकारणात अगदी अपघाताने काही दिवसांसाठी मुख्यमंत्री बनलेल्या सतीश प्रसाद सिंग यांनाही न्यायालयाने बेघर केले आहे. अवघ्या काही दिवसांसाठी मुख्यमंत्री झालेले हे महाशय अनेक वर्षांपासून सरकारी सोयीसुविधांची अक्षरशः लूट करत होते. सत्तेतून बेघर झालेल्या लालू आणि यादव कुटुंबीयांना आता बंगलेही सोडावे लागल्याने ‘एक बंगला लगे प्यारा’ असे गुणगुणण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

सत्यपाल आणि वीरेंद्रकुमार यांना आवरा…
पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात शोक, संताप आणि आक्रोशाची लाट असताना भाजप आणि काँग्रेसच्या नेतेमंडळींचे वर्तन हे जनेतत चीड निर्माण करणारे ठरले. पोलीस सेवेत चमकोगिरी करून पुन्हा राजकारणात प्रवेश केलेले सत्यपाल सिंह हे बेताल बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ‘‘माकड आमचे पूर्वज नाहीत’’ असेही मध्यंतरी या गृहस्थांनी ठोकून दिले होते. मात्र याच सत्यपाल यांना पिटाळून लावल्याची घटना आता मेरठ परिसरात घडली. पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या अजय कुमार या जवानाच्या अंत्यसंस्कारप्रसंगी सत्यपाल हे हसत हसत दाखल झाले. पायात बूट घालून उभे राहिले. अंत्यसंस्कारासारख्या गंभीर प्रसंगीही सत्यपाल यांच्या चेहऱयावर हसू आवरत नव्हते. हा संतापजनक प्रकार पाहिल्यानंतर गावातील काही तरुण उठले आणि त्यांनी त्यांना अक्षरशः पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. अखेर उपरती झालेले सत्यपाल पायातील चपला काढून ठेवल्या. तिकडे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे हरीश रावत यांचे चिरंजीव वीरेंद्र रावत यांच्यावर तर शहीदांच्या स्मरणार्थ रुडकी येथे आयोजित कार्यक्रमात अक्षरशः नोटांची उधळण करण्यात आली. हे वीरेंद्र कुमार निर्लज्जपणे हसतमुखाने या नोटांचा स्वीकार करताना दिसले. राजकीय नेत्यांची संवेदनशून्यता लाज आणणारी आहे हेच खरे!