
>> नीलेश कुलकर्णी
बिहारमधील मुजफ्फरपूरपाठोपाठ उत्तर प्रदेशातील देवरियातील बालिका सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. चार वर्षांपूर्वी एक ‘निर्भया’ प्रकरण घडले आणि त्यात तत्कालीन यूपीए सरकारची ‘आहुती’ पडली होती. त्यावेळी सत्ताधार्यांना ‘बांगड्यांचा आहेर’ पाठविणारे आज केंद्रात सत्ताधीश आहेत. त्यांच्या काळातही चित्र तेच आहे. किंबहुना हिंदुस्थान हा महिलांच्या सुरक्षिततेबाबत जगात सर्वाधिक धोकादायक देश ठरल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. दुर्दैवाने या ज्वलंत विषयावर ज्या विरोधकांनी सरकारला सळो की पळो करायला हवे ते ‘शांत’च आहेत.
बलात्कारासारख्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नये. मात्र या घटना देशात मागील चार वर्षांत ज्या वेगाने वाढल्या आहेत, हा सगळा प्रकार राज्यकर्त्यांना लाज आणणारा आहे. चार वर्षांपूर्वी ‘निर्भया’ प्रकरणानंतर भाजपवाल्यांनी तत्कालीन काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारला धारेवर धरले होते. आज ते सत्तेवर आहेत आणि महिला सुरक्षिततेबाबत परिस्थिती गंभीरच आहे. मग राजवट बदलून काय फरक पडला? विद्यमान सत्ताधारी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा डंका वाजवीत आहेत. मात्र हिंदुस्थान महिला सुरक्षिततेच्या बाबतीत जगातील सर्वाधिक धोकादायक देश असल्याचे सर्वेक्षण आता पुढे आले आहे. म्हणजे महिला असुरक्षिततेबाबत अफगाणिस्तान, सीरिया आणि सोमालियासारख्या देशांपेक्षाही आपण ‘अव्वल’ आहोत ही खेदाची बाब आहे. त्याचवेळी बिहारमधील मुजफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशमधील देवरिया येथील बालिका सामूहिक बलात्कार प्रकरणे घडत आहेत आणि देशाची मान खाली झुकत आहे. अर्थात ‘निर्भया’ प्रकरणाच्या वेळी जंतरमंतरवरून तत्कालीन सरकारविरोधात आवाज उठविणारे ‘टीम अण्णा’ आज कुठे लपले आहेत? विरोधी पक्षांनीदेखील देवरिया आणि मुजफ्फरपूरसारख्या प्रकरणावरून संसदेत आणि संसदेबाहेर सरकारला ‘दे माय धरणी ठाय’ करायला हवे होते. मात्र तेदेखील गप्प आहेत. पंतप्रधानांना ‘मिठी’ मारून तात्पुरती राजकीय बाजी मारता येते, मात्र राजकारणातील दीर्घकालीन यशासाठी ज्वलंत विषयांवर विरोधकांनी जोरदार आवाज उठवायला हवा. विरोधक हे अवसान दाखवणार कधी? उत्तर प्रदेश-बिहारमध्ये अनेक ‘निर्भया’ बळी पडत असताना विरोधक ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून गप्प का आहेत?. लोकसभेत काँग्रेसच्या रंजिता रंजना व आरजेडीच्या जयप्रकाश नारायण यादवांचा अपवाद वगळता हा विषय विरोधकांनी ताणून धरलेला नाही. राहुल गांधी एकीकडे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत, विद्यमान पंतप्रधानांवर शेलक्या शब्दांत टीका करत आहेत, पण संसदेत या मुद्दय़ावर पंतप्रधानांना घेरण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. सोनिया गांधीही मौनात आहेत. मायावती व ममता बॅनर्जींसारख्या रणरागिणींनीही या विषयाला हात घातलेला नाही. निर्भया प्रकरणातून दिल्लीचे मुख्यमंत्रीपद काबीज केलेले अरविंद केजरीवालही ‘गप्प’ आहेत.
राज्यसभेत हरी हरी…
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना व अकाली दलाने साथ दिल्यामुळे एनडीएप्रणीत हरिवंश सिंग यांची सरशी झाली. उपसभापतीपदासाठी संयुक्त जनता दलाचे हरिवंश सिंग तर काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद या दोन ‘हरीं’मध्ये मुकाबला होता. त्यामुळे कोणीही जिंकले तरी राज्यसभेत ‘हरी हरी, जय हरी’ होणार हे निश्चित होते. आपण जिंकूच शकत नाही असा न्यूनगंडाचा गळू सध्या काँग्रेसला झाल्याने या निवडणुकीतही सत्तापक्षाची सरशी झाली. वास्तविक राज्यसभेत एनडीएचे संख्याबळ अपुरे होते. तेव्हा व्यवस्थित फासे टाकले असते तर कदाचित चित्र बदलले असते. मात्र सत्तापक्षातील ‘चाणक्यां’नी बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा नवीन पटनायकांनाही गळी लावले. काँग्रेस पक्ष अशा चुका सातत्याने करत राहिला तर विरोधकांना 2019 मध्ये राजकीय भवितव्य राहील की नाही अशी शंका यावी असे सध्याचे राजकीय वातावरण आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी मित्रपक्षाला उमेदवारी देण्याचे कबूल करून काँग्रेसने ऐनवेळी टांग मारल्याने ‘फेडरल फ्रंट’ चे काय होणार असा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे. उपसभापती बनलेल्या हरिवंश यांची कहाणी मनोरंजक आहे. हरिवंश पत्रकार बनले तेच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीच्या प्रभावातून. जेपींच्या गावातला एका सामान्य शेतकरी कुटुंबातला हा मुलगा पुढे पत्रकार झाला, त्यानंतर बँकेत अधिकारी झाला. नंतर पुन्हा पत्रकारितेत येऊन संपादक झाला. चंद्रशेखर औटघटकेचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा राजकीय सल्लागारही बनला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे विश्वासू असलेले हरिवंश आता थेट राज्यसभा उपसभापतीपदाच्या खुर्चीत बसले आहेत. एक अभ्यासू पत्रकार राज्यसभेला उपसभापती मिळाल्यामुळे या सभागृहाची उंची अधिकच वाढेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
‘चौकीदार’ गेले
हिंदुस्थानच्या ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणार्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ‘कान आणि डोळे’ म्हणून ओळखले जाणारे आर. के. धवन यांचे नुकतेच निधन झाले. 22 वर्षे केंद्रातील सत्तावर्तुळात सर्वशक्तिमान भूमिका बजावणारा हा माणूस ‘पडद्याआडचा खरा सूत्रधार’ होता. पाकिस्तानच्या फाळणीतून कुटुंब दिल्ली कँटमध्ये आल्यानंतर आपल्या मामासोबत फुगे विकणारा हा मुलगा पुढे मामाच्याच ओळखीने इंदिराजींकडे टाइपरायटर, स्टेनोग्राफर म्हणून चिकटला .पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे. त्यानंतरच्या दोन दशकांत याच धवन यांच्यापुढे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि इतर तालेवार नेतेमंडळी ‘सर…सर’ करत कुर्निसात करताना दिल्लीने पाहिले. धवन यांचे राजकीय विरोधक त्यांना ‘चौकीदार’ म्हणत असत. त्यांचा ग्रीन सिग्नल नसेल तर इंदिराजींची भेट निव्वळ अशक्यच समजली जायची. अनेक राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या नियुक्त्या त्यांनीच जाहीर केल्या होत्या. देशाचे गृहमंत्री असताना ग्यानी झैलसिंग यांचा पाणउतारा इंदिराजींनी धवन यांच्यासमोर केल्यानंतर तर धवन यांचे ‘माहात्म्य’ अधिकच रुजले. देशात आणीबाणी लागू करा असा सल्ला इंदिरा गांधी यांना देणारे पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे ‘ते’ पत्र आपल्याकडे असल्याचा दावा धवन नेहमीच करायचे. इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली त्यावेळी त्यांच्यासोबत धवनच होते. पुढे चौकशी आयोगाच्या अनेक चौकशांना त्यांना सामोरे जावे लागले. संशयाची सुई कायम त्यांच्याकडे राहिली. आयुष्याच्या सायंकाळी आत्मचरित्र लिहायचा धवन यांचा मानस होता. हे आत्मचरित्र अर्जुनसिंग किंवा नटवरसिंग यांच्या आत्मचरित्रासारखे बुळबुळीत न ठरता देशातल्या अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींचे रहस्योद्घाटन त्यातून करण्याचा धवन यांचा विचार होता. दुर्दैवाने हा राजकीय धमाका करण्याअगोदरच धवन काळाच्या पडद्याआड गेले.





























































