
- नीलेश कुलकर्णी, [email protected]
देवभूमी असलेल्या हिमाचलमध्ये लोकसभेच्या एका व विधानसभेच्या तीनही पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपचा सुपडा साफ झाल्याने राजकीय बदलाचे वारे देशभरात पह्फावणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हिमाचल हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे गृहराज्य. त्यांच्याच राज्यात भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या जिल्ह्यात भाजपची वाताहत झाली. पुढील वर्षी हिमाचलमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे भाजपसाठी ‘वेकअप कॉल’ आहे. देवभूमीतील पराभवाचे झटके देशभर परिणाम घडविणार हे निश्चित.
देशभरातील पोटनिवडणुकांत भाजपची जबरदस्त पीछेहाट झाली, मात्र सध्या चर्चा हिमाचलची जास्त आहे. त्याचे कारण म्हणजे या राज्यात झालेली भाजपची पुरती वाताहत. जे. पी. नड्डा विरुद्ध माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल हा भाजपांतर्गत संघर्ष जुनाच आहे. कधीकाळी राज्याचे पर्यावरण व आरोग्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी करणारे नड्डा हे पुढचे मुख्यमंत्री होतील अशी हवा हिमाचलात तयार झाल्यानंतर धुमल यांनी चतुराईने नड्डा यांना राज्याच्या राजकारणातून बेदखल करून दिल्लीच्या राजकारणात राज्यसभेवर पाठविले, मात्र कोणाचे नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. त्याप्रमाणे नड्डा अचानकपणे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊन सर्वांचेच ‘बिग बॉस’ बनले. त्यामुळे त्यांनी अलगदपणे धुमल यांना उचलून राजकारणाच्या अडगळीत फेकून दिले. जयराम ठाकूर या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळवून दिली, मात्र ठाकूर नड्डांच्या परीक्षेस उतरले नाहीत. गेली चार वर्षे अनागोंदीचा कारभार त्यांनी केला. त्याचा फटका भाजपला पोटनिवडणुकीत बसला. वीरभद्रसिंग या टोलेगंज काँग्रेस नेत्याच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा त्यांच्या पत्नी प्रतिभा यांना मिळाला असला तरी भाजपचे घटलेले मताधिक्य चिंतेचा विषय आहे. हिमाचलमधील पराभवासाठी महागाईच्या माथी तेथील मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे खापर पह्डत असताना ‘‘महागाईमुळे नाही, तर इतर कारणांमुळे भाजपचा पराभव झाला’’ असे परखड मत मांडून पेंद्रीय मंत्री व धुमल यांचे चिरंजीव अनुराग ठाकूर यांनी नव्या संघर्षाची नांदी दिली आहे. अनुराग यांनी दिवाळीचा मुहूर्त साधून माता ज्वालामुखीचे सहकुटुंब दर्शन घेतले आहे. ठाकुरांचे ‘जयरामजी की’ झाले की, आपण तयारच आहेत असेच संकेत यातून त्यांनी दिले आहेत. महागाई हा देशातील ज्वलंत मुद्दा होता आणि आहे. देशात महागाई वाढली आहे असे म्हणणाऱ्याची टिंगलटवाळी करणाऱ्या भाजपच्या मंडळींना या पोटनिवडणुकांनी धडा शिकवला आहे. सर्वसामान्य जनतेला शेवटी पोटाची भूक महत्त्वाची असते. दोनवेळचा घास महागाईने दुरापास्त होत असताना भुकेल्या जनतेने राज्यकर्त्यांना जमिनीवर आणले आहे. ‘महागाईचे सत्यकथन’ करणाऱ्या जयराम यांनी आता ‘राजकीय बलिदाना’साठी तयार राहिलेले बरे!
एलनाबादचा भुर्दंड
हरयाणातील एलनाबादच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे इंडियन नॅशनल लोकदल या पक्षाचे अभय चौटाला यांनी विजय मिळविला, मात्र ही पोटनिवडणूक कोणत्या उदात्त कारणासाठी झाली, तर मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात या चौटाला महाशयांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत मोदींच्या राज्यात शेतकरी सोन्याची काठी घेऊन फिरायला लागला आहे असा भास या चौटालांना झाला असावा. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे याचा सोयिस्कर विसर पडल्याने त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याचा निर्णय घेतला व निवडणूकही जिंकली. या पोटनिवडणुकीने नेमके शेतकरी व जनतेसाठी काय हशील झाले, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. सातत्याने होणाऱ्या निवडणुका व पोटनिवडणुकांचा खर्च देशाला परवडणारा नाही. शेवटी हा पैसा सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जात असतो, मात्र अभय चौटालांसारख्या नेत्यांचा राजकीय ‘स्टंट’ होतो. त्यात गोरगरीब जनतेची परवड होते. ज्या कारणांसाठी चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता ती पूर्ण झाली काय? शेतकऱ्यांना खरोखरीच ‘अच्छे दिन’ आले काय, असा सवाल खरे तर हरयाणातील जनतेने निवडणुकीत चौटाला यांना विचारायला हवा होता, मात्र अभय चौटाला यांच्या नावाने अजूनही तिथला मतदार घाबरतो. अशा स्थितीत ‘आले चौटालाच्या मना तेथे कोणाचे चालेना’ असे म्हणत जनतेने दडपणाखाली का होईना, चौटाला यांनाच कौल दिला आहे. अर्थात त्यांचे मताधिक्य केवळ सात हजारांवर आणून जनतेने यापुढे आम्हाला गृहित धरू नका असा इशाराही चौटाला यांना दिला आहे. दुसरीकडे या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मिळालेली 60 हजार मते ही शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनीदेखील चिंतन करावे अशीच आहेत.
बूम बूम बोम्मई
वाढत्या वयाचा दाखला देत भाजप श्रेष्ठाRनी कर्नाटकातून येडियुरप्पांना ‘मार्गदर्शक मंडळा’त ढकलून ज्यांनी हयातभर भाजप व संघविरोधी राजकारण केले अशा एस. आर. बोम्मई यांचे चिरंजीव बसवराज यांना आयात करून मुख्यमंत्रीपदी नेमले, मात्र त्यानंतरही बोम्मई यांच्या स्वतःच्या हंगल जिल्ह्यात विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव त्या पक्षाची काळजी वाढविणारा आहे. बसवराज हे कुशल प्रशासक मानले जातात. तुलनेने तरुण असल्याने ते धडाडीने काम करतील व भाजपला चांगले यश मिळवून देतील हा हिशेब दिल्लीकर भाजपवाल्यांचा होता. कोरोनाची स्थिती नीट न हाताळणे व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे येडियुरप्पांच्या जागी बोम्मईंची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून नवे मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या आत बिटकॉईन घोटाळ्याच्या आरोपात अडकले. हजारो कोटींच्या या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस करून बोम्मईंनी ‘पाकसाफ’ असल्याचा दावा केला असला तरी त्याचाही परिणाम पोटनिवडणुकांवर झाला. शिवाय अवघ्या बारा वर्षांत भाजपात प्रवेश करून मुख्यमंत्रीपदाचा बोम्मई यांनी गाठलेला सोपान अनेकांच्या पचनी पडलेला नाही. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, श्रीरामलू, सी. टी. रवी, ईश्वरप्पा, मुरगेश निरानी, आर. अशोक अशी भलीमोठी रांग मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून तयार असताना दिल्लीकरांनी बोम्मईंचा राज्याभिषेक उरकल्याने या निष्ठावंतांमध्ये नाराजी होतीच. त्याची परिणती मुख्यमंत्र्यांच्या हंगल जिल्ह्यातील भाजप उमेदवाराच्या दारुण पराभवात झाली आहे. ‘‘बूम बूम बोम्मई’’ म्हणत दिल्लीकरांनी बोम्मईंना कर्नाटकावर लादले असले तरी त्या राज्याने त्यांना अजून तरी स्वीकारलेले नाही हेच हा निकाल सांगतो.



























































