
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
30 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यापासून संसदेचे अधिवेशन (थोडी विश्रांती) वगळता ‘तारीख पे तारीख’ म्हणत ‘हनुमानाच्या शेपटी’प्रमाणे लांबतच चालले आहे. त्यामुळे आता संसदेतील कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वपक्षीय खासदारही या अधिवेशनाला कंटाळले आहेत. खासदारांची अवस्था ‘घाण्याला जुंपल्या‘सारखी झाली आहे. विरोधी पक्षाचे खासदार किमान काही बोलू तरी शकतात, पण प्रचंड बहुमतवाल्यांची अवस्था ‘नाक–तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ झाली अशी आहे.
संसदेचे विद्यमान अधिवेशन कामकाजाचा विक्रम करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. लोकसभा अध्यक्षांनी कामकाजाच्या मर्यादेचे सर्व ‘रेकॉर्ड’ मोडून काढत रात्री दहा-बारा वाजेपर्यंत काहीही होवो कामकाज रेटायचे म्हणजे रेटायचेच, असा चंगच बांधल्यामुळे खासदारांची अवस्था ‘मारून मुटकून हनुमान’ अशी झाली आहे. दिवसभर सभागृहात बसायचे, सभागृहात कोण बसतो हे पाहण्यासाठी आता नरेंद्र मोदींच्या जोडीला अमित शहा यांची ‘करडी नजर’ असल्याने भाजप खासदारांना तर ‘चुळबूळ’ करायचीही संधी नाही. त्यामुळे ‘हातावर घडी तोंडावर बोट’ अशा ‘पोझ‘मध्ये गेले सुमारे दीड-दोन महिने खासदार महोदय संसद अधिवेशनाच्या ‘कठीण परीक्षे’ला सामोरे जात आहेत. खासदार हे पंधरा-वीस लाख मतदारांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे त्यांचा वेळ अमूल्यच असतो. मतदारांच्या अपेक्षाही प्रचंड असतात, मात्र संसदेचे अधिवेशन हे लांबतच चालल्याने आता खासदारही सरकार आणि अधिवेशनावर वैतागले आहेत. ‘रेकॉर्ड’ बनविण्याच्या तंद्रीत असलेल्या सरकारने किमान खासदारांच्या भावना तरी लक्षात घ्यायला हव्यात.
दिल्लीत या मोसमात ‘उमस’ नावाचा भयंकर प्रकार असतो. या वातावरणात अंगातून घामाच्या अक्षरक्षः धारा लागतात. संसदेचे अधिवेशन नेमके याच काळात सुरू आहे आणि ते ‘वाढता वाढता वाढे’ अशा पद्धतीने चालले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील एका खासदाराची प्रतिक्रिया ऐकण्याजोगीच आहेच. ‘भाईसाब, हमारी दोनो तरफ सें डफली हो गयी है. एक तो ये उमस पसीना निकाल रही है और दुसरी तरफ हमारी सरकारने पसीना पसीना कर दिया है. दिन-रात संसद मे बैठना पडता है. घरमे पचास सौ लोग काम के लिए आते हे किसी को लेटर चाहिए, किसीको मंत्री से मिलना है. कुछ भी नही कर पाते. मई से लगातार दिल्ली में हूं. क्षेत्र मे मेरे विरोधीयोंने ‘सासंद लापता है’, ऐसा बोर्ड जगह जगह लगाया है, क्या करे?’ ही आणि अशीच अवस्था बहुतांश खासदारांची आहे, पण मीडियालाही कोणी धडपणे बोलू शकत नाही. खासदार म्हणून जनतेच्या अपेक्षांचे ओझे वाहावे लागते. दिल्लीतही घरी लोक गर्दी करतात. या सर्वांना कसे तोंड द्यायचे हा प्रश्न आ वासून उभारलेला असताना ‘रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग’ या पद्धतीने संसदेतच बसून राहावे लागत असल्याने राज्यसभेत त्याचा भडका अखेर उडालाच. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी तुम्हाला ‘रेकॉर्ड‘मध्ये इंटरेस्ट आहे तर ती बनवा, पण संसद ही काही विधेयके मंजूर करायची ‘फॅक्टरी’ नाही, अशा शब्दांत सरकारला सुनावले तर समाजवादी पार्टीच्या रामगोपाल यादवांनी सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सभागृहात बसावे लागत असल्याने तब्येत बिघडत असल्याची तक्रार करत बाकी खासदारांनाही ‘तब्येतीला सांभाळा हो‘, असा सल्ला दिला. सत्तर वर्षांत झाले नाही इतके काम मोदी सरकार करत आहे हे सांगण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. त्यासाठी सुरुवातीला संसदेतील ‘स्टाफ’ वेठीस धरला गेला. त्यात महिला कर्मचाऱयांची कुचंबणा खूप मोठी आहे. रात्री-बेरात्री घरी कसे परतायचे, हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे, तर घरी ठाण मांडून बसलेल्या मतदारांचे समाधान कसे करायचे? हा खासदारांपुढचा प्रश्न. या प्रश्नाचे कोडे मायबाप सरकारला मात्र पडलेले दिसत नाही. संसद अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी पत्रकार परिषद घेऊन इतके अमूक तमूक विक्रमी कामकाज झाले म्हणून पाठ थोपटून घेतीलही, पण बिचाऱया खासदारांचे काय! 17 व्या लोकसभेला निवडून आल्यानंतर पहिल्यांदा खासदार झालेल्या काही जणांना तर अजून मतदारसंघात जाऊन मतदारांचे धडपणे ‘आभार‘ही मानता आलेले नाहीत. मायबाप सरकारने आता लवकरच खासदारांना किमान ‘आभार प्रदर्शना’ची ‘संधी’ तरी द्यावी नाहीतर मतदारच त्यांचे ‘कायमचे आभार’ मानतील.
काँग्रेसमधली ‘हाणामारी…’
लोकसभा निवडणुकीनंतर गर्तेत गेलेल्या काँगेसला गेल्या दोन महिन्यांत पक्षाचा अध्यक्ष निवडता आला नसला तरी काँग्रेस सध्या ‘ब्रेकिंग न्यूज’ बनली आहे ती त्या पक्षाच्या नेत्यांनी झारखंडच्या राजधानीत केलेल्या हाणामारीमुळे. या मारामारीमुळे काँग्रेसमधली ‘मरगळ’ कितपत झटकली गेली ते एकमेकांना थोबडवलेले काँग्रेसी नेतेच सांगू शकतील, मात्र सत्तेत नसली तरी रांचीमधील काँग्रेस कार्यालयाला छावणीचे रूप गेल्या आठवडय़ात आले होते. तिथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार आणि त्यांचे विरोधक माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय व राज्यसभेचे खासदार प्रदीप बालमचू यांच्या समर्थकांत अशी काही ‘फ्री स्टाइल’ रंगली की बघणाऱयांच्या डोळ्यांचे पारणे फिटावे. रांचीतल्या काँग्रेसजनांनी एकमेकांची थोबाडे सुजवली आहेत ही वार्ता कानी पडल्यानंतर दिल्लीतील काँग्रेस दुढ्ढाचार्यांनी या ‘हाणामारीफेम’ नेत्यांना दिल्लीत पाचारण केले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या राहुल गांधी यांनी काँगेसी हाणामारी विदेशात बसून ‘एन्जॉय’ केली. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या बरोबरीने झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तोंडावर निवडणुका आलेल्या राज्यात काँगेसने किती ‘जोराची तयारी’ केली आहे, हे हाणामारीवरून स्पष्टच झाले आहे. लोकसभेच्या पराभवानंतर मीडियातूनही गायब झालेल्या काँग्रेसला काही काळासाठी का होईना ‘ब्रेकिंग न्यूज’ बनविलेल्या झारखंडच्या काँगेसजनांचे हायकमांडने आभारच मानायला हवेत !
‘जय विज्ञान’चे काय झाले?
अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना ‘जय जवान जय किसान’ या लालबहादूर शास्त्रींच्या घोषणेला जोडून ‘जय विज्ञान‘चा नारा जोडला होता. राजीव गांधी आणि नरसिंह राव या दूरदृष्टीच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीला खरी चालना मिळाली होती. नुकतेच ‘चांद्रयान-2’ मोहीम फत्ते केल्यानंतर देशभरात आनंदोस्तव साजरा केला जात आहे. भाजपची काही उत्साही मंडळी जणू सत्ताधारी पक्षानेच हे चांद्रयान उडवले आणि सुस्थापित केले, अशा आविर्भावात जल्लोष करत आहेत. कोणत्याही मोहिमेला राजकीय नेतृत्वाचे भक्कम पाठबळ असावे लागते. ते नरेंद्र मोदींनी दिले हे मान्य, पण ‘इस्रो’मधील वैज्ञानिकांचा प्रोत्साहन भत्ता रद्द करण्याचा निर्णय मोदींच्या सरकारने घेतल्यामुळे ‘जय विज्ञान’चे काय होणार, असा प्रश्न आता विरोधक करू लागले आहेत. मात्र 1 जुलै रोजी मोदी सरकारने फर्मान काढून डी, ई, एफ आणि जी श्रेणीतील वैज्ञानिकांचा प्रोत्साहन भत्ता बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. या निर्णयामुळे ‘इस्रो’मधील 90 टक्के शास्त्र्ाज्ञ व इंजिनीअर्सचा पगार किमान दहा हजार रुपयांनी कमी होणार आहे. जगभरातले देश विज्ञान-तंत्रज्ञानाला चालना मिळावी म्हणून सर्व ताकद पणाला लावून काम करत असताना जागतिक महासत्तेची स्वप्ने बघणाऱया हिंदुस्थानचे मायबाप सरकार वैज्ञानिकांच्या पगारालाच कात्री लावत आहे, हे दुर्दैवी आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात वैज्ञानिकांच्या संघटनेने खरमरीत पत्र पाठवून सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. चांद्रयानाच्या विजयी जल्लोषातून राज्यकर्ते जमिनीवर उतरले असतील तर या पत्राकडे पाहण्यास त्यांना नक्कीच वेळ मिळेल. बघूयात वैज्ञानिकांचे आणि ‘जय विज्ञान’च्या नाऱयाचे पुढे काय होते ते.


























































