आजचा दिवस केजरिवालांसाठी खास, स्टेजवरून सांगितलं सिक्रेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind-kejriwal

दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला आणि दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला दणदणीत मतांनी सत्तेत बसवलं. आता अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील. यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस विशेष आहेच मात्र आणखी एक कारणामुळे त्यांच्यासाठी हा दिवस खास आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीचा आज वाढदिवस आहे. त्यामुळेच आजचा दिवस खास असल्याचे त्यांनी स्टेजवरून सांगितले.

दिल्ली विभानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला साथ दिली आहे. 70 जागांसाठी झालेल्या मतमोजणीमध्ये आपला जवळपास 60 पेक्षा जास्त जागा मिळणार हे स्पष्ट झाले. निकाल स्पष्ट झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले आहेत.

‘दिल्लीकरांनी आपल्या मुलावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार. आज मंगळवार आहे, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी विजयाबद्दल प्रभू हनुमानाचे आभार मानले आहे. प्रभु हनुमानजींनी आपल्याला पुढेही योग्य रस्ता दाखवावा’, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. पुढील पाच वर्षे जनतेची सेवा करणार असल्याचेही अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.

दिल्लीकरांनो आय लव्ह यू… धन्यवाद तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुलाला जिंकून दिलं. आम्हाला जबरदस्त समर्थन दिलं त्याबद्दल धन्यवाद. आजचा विजय त्यांच्या आहे ज्यांना 24 तास वीज मिळाली, चांगल्या शाळा मिळाल्या, घरात पाणी मिळालं’. असे म्हणतानाच त्यांनी दिल्लीकरांचे कौतुकही केले. “दिल्लीकरांनी नव्या राजकारणाला जन्म दिला, ते म्हणजे ‘कामाचे राजकारण’. दिल्लीकरांनी दाखवून दिलं मत त्यालाच जो शिक्षण देईल, मोहल्ला क्लिनिक देईल, घराला पाणी, वीज देईल. हा देशासाठी शुभ संदेश आहे. हेच राजकारण देशाला 21 व्या शतकात घेऊन जाईल’, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला.