
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने अत्यंत सुमार कामगिरी केली आहे. त्यांच्या इतिहासातील ही सर्वात लाजिरवाणी कामगिरी असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. काँग्रेसने शीला दिक्षित यांच्या नेतृत्वात 15 वर्ष दिल्लीवर राज्य केलं होतं. मात्र सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाहीये. काँग्रेसने या निवडणुकीत 66 उमेदवार उभे केले होते, ज्यातील 63 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केली होती. मित्र पक्षासाठी काँग्रेसने 4 जागा सोडल्या होत्या आणि बाकी जागांवर स्वत:चे उमेदवार उभे केले होते. निवडणुकीसाठीच्या कायद्यानुसार उमेदवाराला अनामत रक्कम वाचवायची असेल तर एकूण मतदानापैकी 1/6 (16.6%) टक्के मते मिळवावी लागतात. हे करणं काँग्रेसच्या 63 उमेदवारांना जमले नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांना 10 हजार रुपयांची रक्कम डिपॉझिट म्हणून निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. जर उमेदवाराला आवश्यक तेवढी मतं मिळाली नाही तर त्याचे डिपॉझिट जप्त होते. यामुळे काँग्रेसच्या 63 उमेदवारांनी अनामत रक्कम म्हणून भरलेले 10 हजार रुपये जप्त झाले आहेत.
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांची मुलगी शिवानी चोपडा यांचाही अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये समावेश आहे. दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांच्याही मुलीची अनामत रक्कम जप्त झाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष किर्ती आझाद यांच्या बायकोलाही पराभवाचे तोंड पाहावे लागले असून त्यांचीही अनामत रक्कम जप्त झाली आहे. आपमध्ये असताना आमदार म्हणून निवडून आलेल्या अलका लांबा या वर्षभरापूर्वी काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या. त्यांना यंदा काँग्रेसने तिकीट दिलं होतं, मात्र त्यांचीही अनामत रक्कम जप्त झाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 22.46 टक्के मते मिळवली होती. या निवडणुकीत काँग्रेसने आपला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं होतं. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल असे त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत होतं. काँग्रेसच्या मतांची टक्केवारीही यंदा कमी झाली आहे. 2015 साली काँग्रेसला 9.7 टक्के मते मिळाली होती, जी यंदाच्या निवडणुकीत फक्त 4.2 टक्के इतकी झाली आहे. शीला दिक्षित यांचा मुलगा आणि माजी खासदार संदीप दिक्षित यांनी काँग्रेसच्या पराभवाला अंतर्गत राजकारण जबाबदार असल्याचं म्हटलंय. निकाल पाहून आपल्याला अजिबात आश्चर्य वाटलं नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
काँग्रेससाठी आणखी एक चिंतेची बाब आहे ती म्हणजे ज्या उमेदवारांसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनी ज्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा सपाटून पराभव झाला आहे आणि तिथे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. काँग्रेसच्या या पराभवानंतर तिथले प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांनी जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे.
























































