बाबा रामदेव कुणाच्या नियंत्रणात नाहीत! दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

योगगुरू बाबा रामदेव यांना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिला. ‘हमदर्द’ कंपनीच्या उत्पादनाला ‘शरबत जिहाद’ म्हणणाऱ्या बाबा रामदेव यांनी कोर्टाच्या आदेशानंतरही सोशल मीडियात आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केला. त्यावर न्यायालयाने बाबा रामदेव यांना अवमान कारवाईचा इशारा देत आक्षेपार्ह व्हिडीओ 24 तासांत हटवण्याचा आदेश दिला. बाबा रामदेव कुणाच्या नियंत्रणात नाहीत, अशी खोचक टिप्पणीही न्यायालयाने केली.

बाबा रामदेव यांनी हमदर्दच्या ‘रुह अफझा’ पेयला ‘शरबत जिहाद’ म्हटले. त्यावर हमदर्द कंपनीने पतंजलीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. कंपनीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने बाबा रामदेव यांना हमदर्द तसेच इतर कुठल्याही कंपनीसंबंधी वादग्रस्त विधान न करण्याची तंबी दिली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बाबा रामदेव यांनी पुन्हा आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने बाबा रामदेव यांना अवमान नोटीस जारी करण्याचा इशारा दिला. बाबा रामदेव कुणाच्या नियंत्रणात नाहीत, ते आपल्याच विश्वात जगतात, असे न्यायमूर्ती अमित बन्सल म्हणाले. त्यामुळे हादरलेल्या बाबा रामदेव यांच्या वकिलांनी आक्षेपार्ह व्हिडीओ हटवण्याची हमी दिली. त्यावर तो व्हिडीओ 24 तासांत यूटय़ूब व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवा आणि आदेशाचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र आठवडाभरात दाखल करा, असे आदेश न्यायालयाने दिले.