
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
नवी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर कॅबचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणी शुक्रवारी रात्री मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीहून परतत असताना कॅबचालकाने तिला गुंगीचे औषध टाकलेले चिप्स खाण्यास दिले. ते खाल्ल्याने तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर नराधम चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तीन तासांनतर तिला रस्त्यावर फेकल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
मित्राचा वाढदिवस असल्याने पीडित तरुणी शुक्रवारी रात्री पंचकुया रोड परिसरात राहणाऱ्या मित्राच्या घरी पार्टीसाठी गेली होती. पार्टी संपल्यानंतर जेएनयूमध्ये परतण्यासाठी तिने एका व्यक्तीच्या मोबाईलवरून कॅब बुक केली. प्रवासादरम्यान तिला चालकाने चिप्स खाण्यास दिल्या. त्या खाताच ती बेशु्द्ध झाली. त्यानंतर चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शुद्धीत आल्यानंतर आयआय़टी प्रवेशद्वाराजवळील एका बागेत आपल्यात फेकण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तरुणी कशीबशी हॉस्टेलमध्ये पोहचली.
दुसऱ्या दिवशी तिने याबद्दल पोलिसात तक्रार केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी तिला सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले. तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून पीडित तरुणी सतत जबाब बदलत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ज्याठिकाणी ही घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीला अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.





















































