
डाव्या विचारांच्या चळवळीचे केंद्र असणाऱया जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात आले. जेएनयूच्या कॅम्पस डेव्हलपमेंट कमिटीच्या कार्यकारी मंडळाने देशातील महापुरुषांची नावे जेएनयूमधील विविध रस्त्यांना देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार हे नामकरण झाले.
सीएए विरोधी आंदोलनापूर्वीही कन्हैयाकुमारचे आंदोलन आणि डाव्यांच्या चळवळीचे केंद्र म्हणून जेएनयू देशभरातच परिचित आहे. सीएए विरोधी आंदोलकांवर झालेल्या पोलिसी हल्यामुळेही जेएनयू मध्यंतरी चांगलेच चर्चेत आले होते. डाव्या आणि काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनांचा वीर सावरकरांचे नाव देण्यास विरोध होता. मात्र, कार्यकारी मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार आज जेएनयूमधील सुबनसर हॉस्टेल जवळच्या एका रस्त्याला वि.दा. सावरकर असे नाव देऊन तशी पाटी लावण्यात आली.





























































