मोदी-शहा की या 3 नेत्यांवर फुटणार पराभवाचे खापर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पण एकंदर निकाल बघता भाजपला मागे टाकत काँग्रेसने मध्य प्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आघाडी घेतली आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून या अपयशाचे खापर नक्की कोणावर फुटेल अशी चर्चा भाजप नेत्यांमध्ये रंगली आहे.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये 2014 साली उधळलेला भाजपचा विजयाचा अश्वमेध काँग्रेसने रोखला आहे. छत्तीसगडमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. येथे काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. छत्तीसगडमध्ये गेली 15 वर्ष रमण सिंह यांची सरकार होती. यामुळे छत्तीसगड हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. पण या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला पराभवाची धूळ चारल्याने या पराभवाचे खापर मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावरच फुटण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई सुरू आहे. मध्य प्रदेशात आरएसएसची मजबूत पकड आहे. यामुळे जर येथे भाजपला पराभव पत्करावा लागला तर ही भाजप समर्थकांसाठी निंदनीय बाब ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत 2014 साली मध्य प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले होते. येथे 29 जागांपैकी 27 जागांवर भाजप निवडून आली होती. तर काँग्रेसला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. पण नंतर एका जागेसाठी झालेल्या उपनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता. यामुळे भाजप 26 तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. पण आता येथे काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तसेच शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे मोठे नेते असून त्यांचा येथे दबदबा आहे. असे असताना जर भाजप पराभूत झाला तर त्याचे खापर शिवराज सिंह चौहान यांच्यावरच फुटेल अशी चर्चा दबक्या आवाजात भाजप वर्तुळात सुरू आहे.

राजस्थान

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, छ्त्तीसगड बरोबर राजस्थानही भाजपसाठी महत्वाचे राज्य ठरले होते. येथील सर्व 25 लोकसभा जागांवर कमळ फुलले होते. पण विधानसभेत हार पत्करावी लागेल अशी भीती भाजपला होतीच. कारण मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर येथील जनता नाराज होती. पण निवडणुकीच्या आधी राजे यांना हटवणे योग्य नसल्याने त्यांना पक्षश्रेष्ठींनी कायम ठेवले होते. यामुळे राजे यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्व जोर लावला होता. पण एकंदर निकाल पाहता भाजप व काँग्रेसमध्ये येथे अटीतटीचा सामना रंगला आहे. यामुळे जर भाजपचा पराभव झाला तर राजे यांना पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा सामना करावा लागेल असे बोलले जात आहे.

तेलंगणा-मिझोरम

तेलंगणा आणि मिझोरममध्येही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. असे असले तरी मिझोरममध्ये भाजपने एक जागा मिळवत खाते उघडले आहे. यापूर्वी भाजप इथे फार ताकद नव्हती. मात्र यावेळी येथे पूर्ण ताकद लावली होती. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काँग्रेसमुक्त ईशान्यचा नारा दिला होता. पण येथे मिझो नॅशनल फ्रंटचे सरकार बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.