‘आप’चा झाडू भाजपला सत्तेतून साफ करणार, पहिल्या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. तर दुसरीकडे काल दिल्ली महानगर पालिकेसाठी मतदान झाले. या निवडणुकीचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी (7 डिसेंबर) रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार असून तत्पूर्वी आलेल्या पहिल्या एक्झिट पोलमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दिल्ली विधानसभेमध्ये सलग दोन वेळा आम आदमी पार्टीची सत्ता आली, परंतु महापालिका निवडणुकीत अरविंद केजरीवाल याचा करिष्मा दिसत नव्हता. येथे भाजपने बाजी मारली. परंतु यंदा गुजरात निवडणुकीसोबत दिल्ली महानगर पालिकेची निवडणूक लागली आणि आपने भाजपची कोंडी केली. आता ‘इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया’च्या एक्झिट पोलनुसार दिल्ली महापालिकेत आपचा झाडू भाजची सत्ता साफ करणार असल्याचे दिसत आहे.

एक्झिट पोलनुसार दिल्लीत आम आदमी पार्टीला 149 ते 171 जागा मिळताना दिसत असून, सत्ताधारी भाजपला 69 ते 91 जागांवर समाधान मानावे लागताना दिसत आहे. तर काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळताना दिसत आहे. तर इतरांच्या खात्यात 5 ते 9 जागा जाताना दिसत आहे.

दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. यंदा मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने आपचा फायदा होताना दिसत आहे. आपला 46 टक्के महिलांनी आणि 40 टक्के पुरुषांनी मतदान केले आहे. भाजपाला 34 टक्के महिलांनी आणि 36 टक्के पुरुषांनी मतदान केल्याचे यातून दिसत आहे. एकूण मतदानाची टक्केवारीतदेखील मोठा फरक दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपाला 35 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर आपला 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 10 टक्के मते मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

2017मध्ये भाजपने मारली होती बाजी

शेवटची दिल्ली महापालिका निवडणूक 2017 मध्ये झाली होती आणि तेव्हा एकूण वॉर्डांची संख्या 272 होती. यामध्ये भाजपने 181, आप 48, काँग्रेस 30 आणि इतर 11 जागा जिंकल्या होत्या. दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा हा सलग तिसरा विजय ठरला होता.