चालत्या रेल्वेतून 70 लाखांची चोरी, दिल्ली ते मुंबई प्रवासावेळी घडली घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसमधून 70 लाखांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात ही चोरी उघडकीला आली. या प्रकरणी कोटा रेल्वे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

दिल्लीचे रहिवासी असलेल्या विकास सरदाना या ज्वेलरने ही तक्रार दाखल केली आहे. लोहित रेगर नावाचा एक तरुण सरदाना यांच्या दुकानावर काम करतो. विकासने लोहितकरवी लाखो रुपयांचे दागिने दिल्लीहून मुंबईला पाठवले होते. ते दागिने मोडून नवीन घडवण्यात येणार होते. सरदाना यांनी याचप्रकारे मुंबई ते दिल्ली असे दागिने पाठवले होते. यावेळी रिझर्वेशन न झाल्यामुळे लोहितने दंडाची पावती फाडली आणि प्रवास सुरू केला. तो कोच अटेन्डटसोबत बसला होता.

12 डिसेंबर रोजी हा प्रवास सुरू करण्यात आला होता. लोहितला प्रवासात योगेश कुमार आणि रामवीर नावाचे दोन कोच अटेंडन्ट भेटले होते. आपल्या बॅगेत 35 लाख रोख आणि 35 लाखांचे दागिने असल्याची माहिती लोहितने त्या दोघांना दिली होती. योगेश आणि रामवीरने त्याला पुढच्या स्थानकावर सामानची तपासणी केली जाईल, तिथे तू फसू शकतोस असं सांगितलं. त्यामुळे घाबरलेल्या लोहितने ती बॅग त्या दोघांना लपवण्यासाठी दिली. त्यानंतर ते दोघेही कोटा स्थानकावर उतरून पसार झाले. आपल्या बॅगेची चोरी झाल्याचं लक्षात येताच लोहितने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. आता पोलीस या योगेश आणि रामवीरचा शोध घेत आहेत.