राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; 40 विमान फेऱ्यांना फटका, रेड अलर्ट जारी

राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. काही भागात गारपीटही झाली, त्यामुळे तापमानात घट झाली आणि हवामान आल्हाददायक झाले. मात्र, पावसामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच अनेक भागात पाणी साचले आणि या हवामानाचा फटका विमान सेवांनाही बसला. त्यामुळे राजधानीतील जनजीवन विस्कळीत झाले होते.

खराब हवामानामुळे 40 पेक्षा जास्त उड्डाणे वळवण्यात आली, तर सुमारे 100 उड्डाणे विलंबाने होत आहेत. भारतीय हवामान खात्याने राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत दिल्ली आणि आसपासच्या भागात 70-80 किमी प्रतितास वेगाने जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या अवकाळी पावसाने काही दिवस वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळेल आणि कमाल तापमान 40 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिल्लीत वादळी वारे आणि पावसासाठी जारी केलेला रेड अलर्ट सकाळी 8.30 वाजेपर्यंत वाढवला आहे. तसेच लोकांना घरातच राहण्याचा आणि आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी एक विशेष सूचना जारी केली आहे. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरील काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे, असे या सूचनेत म्हटले आहे. प्रवाशांना त्यांच्या विमान उड्डाणाच्या अपडेट्ससाठी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीसह उत्तर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नैऋत्य राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, दक्षिण गंगा किनारी पश्चिम बंगाल आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशांसाठीही हवामान खात्याने इशारा जारी केला आहे. पुढील काही तासांत ओडिशातील कंधमाल, कालाहांडी आणि रायगडा जिल्ह्यांमध्ये ताशी 60 ते 70 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागात वीज कोसळण्याची आणि मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे, ज्यामुळे सामान्य जीवन प्रभावित होऊ शकते.