
दिल्लीतील नीती मित्तल या आठवीत शिकणाऱया विद्यार्थिनीने योगासनांची कमाल केली आहे. वयाच्या अवघ्या 13 वर्षी नीतीने राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरांवर 22 पदके पटकावली आहेत. नुकतेच नीतीने बॅकवर्ड बेंडिंग योग प्रकार दोन मिनिटांत 31 वेळा करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. असा विक्रम करणारी ती सर्वात लहान विद्यार्थिनी आहे.
आदर्शनगरमध्ये राहणारी नीती पीतमपुरा एसडी पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहेत. तिने वयाच्या तिसऱया वर्षांपासून योग करायला सुरुवात केली. शालेय अभ्यासात कोणताही खंड न पडू देता तिने योगाभ्यास सुरू ठेवलाय. मेहनत आणि एकाग्रता, तसेच योग शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन यामुळेच तिने लहान वयात योगमध्ये मोठे यश मिळवले आहे. 2015 पासून ती दिल्लीतील राज्यस्तरीय योग स्पर्धा जिंकतेय. 2020 साली तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला होता.





























































