
आधुनिक समाज जीवनातील पुरुषप्रधान कल्पनांबाबत दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने महत्वपूर्ण भूमिका घेतली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मागणाऱ्या पतीला न्यायालयाने चांगलाच हिसका दिला. पतीने पत्नीच्या दुसऱ्या पुरुषासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. तो आरोप धुडकावतानाच गोपनीयतेचा हवाला देत सीसीटीव्ही फुटेजची मागणी फेटाळून लावली. आधुनिक भारतात पुरुषप्रधान विचारांना स्थान नाही, असे मत न्यायालयाने नोंदवत पतीची कानउघडणी केली.
हिंदुस्थानी लष्करात मेजर पदार कार्यरत असलेल्या पतीने पटिाला हाऊस न्यायलयात धाव घेतली होती. पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहिलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी याचिकाकर्त्या मेजरने केली होती. पटियाला हाऊस न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश वैभव प्रताप सिंग यांनी मेजरची ही मागणी धुडकावली.
न्यायालयाने ग्रॅहम ग्रीन यांच्या ‘द एन्ड ऑफ द अफेअर’ या कादंबरीचा हवाला यावेळी दिला. आपल्या देशात ब्रिटिशकालीन भारतीय दंडसंहिता रद्द करून त्याजागी आता भारतीय न्यायसंहिता लागून करण्यात आली आहे. नव्या संहितेमध्ये व्याभिचाराच्या गुन्ह्याला थारा नाही. यावरूनच आधुनिक भारतात पुरुषप्रधान विचार आणि कल्पनांना स्थान नाही हे स्पष्ट होते, असे न्यायलयाने नमूद केले. एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या पत्नीला पळवतो, ही जुनाट कल्पना आहे. ती खोडली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.