
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
काँग्रेसच्या काळात ‘मिस्टर क्लीन’ म्हणून ज्यांचा कार्यकाळ रंगवला गेला. त्या तुमच्या वडिलांचा शेवट हा ‘भ्रष्टाचारी नंबर-वन’ म्हणून झाला, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर चढविला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांना उद्देशुन बोलताना मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुमच्या वडिलांना इतर देशांनी क्लीन चीट दिली असेल. त्यामुळे तुमच्या नेत्यांनी मोठा गाजावाजा करत ‘मिस्टर क्लिन’ बनवले होते. मात्र, खरे पाहता त्यांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वन च्या रूपात झाला. नामदार हा अहंकार तुम्हाला संपवून टाकेल. हा देश चुकांना माफ करतो पण धोकेबाजी कधी माफ करत नाही, असे मोदी म्हणाले.
मनमोहन सिंग काँग्रेसचे वॉचमन
मनमोहन सिंग काँग्रेसचे प्रामाणिक वॉचमन होते. त्यांना देशाची नव्हे तर खुर्चीची अधिक चिंता असल्याने देश बरबाद झाला, अशी टीका मोदी यांनी केली. 2004 मध्ये सत्ता सांभाळण्याएवढी राजकुमाराची तयारी नसल्याने गांधी कुटुंबाने त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या वॉचमनला सत्तेवर बसविण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.





























































