सणासुदीला धमाके घडवण्याचा पाकड्यांचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी सकाळी दिल्लीतील लक्ष्मीनगर येथून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद अशरफ अली असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव सांगितले जात आहे. तो पाकिस्तानातील पंजाबच्या नरोवाल येथील रहिवासी आहे. दहशतवाद्याजवळून एके-47, 2  पिस्तुले, 50 गोळ्या आणि हॅण्डग्रेनेड अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्याजवळ पोलिसांना हिंदुस्थानी  पासपोर्टदेखील सापडला आहे. दिल्ली पोलिसांना त्याच्याजवळून एक बनावट आयडीदेखील हस्तगत केला. ज्यामध्ये दिल्लीच्या शास्त्री नगरचा पत्ता लिहिला आहे. या आयडीमध्ये त्याचे नाव अली अहमद लिहिलेले आहे. राजधानी दिल्लीच्या रमेश पार्कमध्ये मोहम्मद राहत होता. नवरात्री आणि सणांच्या काळात जिहादी धमाके घडवण्याचे काम मोहम्मद अश्रफ याला दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानात  तालिबानी राजवट आल्यापासून पाकिस्तानने हिंदुस्थानी सीमेवरून घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ केल्याचे बोलले जात आहे.