
दिल्ली पोलिसांनी देशभरात तब्बल 12 हून अधिक ठिकाणी छापेमारी करत 9 संशयित इसिस दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. आधी एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्यानंतर देशभरात छापेमारी करत त्याच्या आणखी आठ साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत दिल्ली पोलिसांसोबत केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यांच्या दहशतवादविरोधी पथकांनी संयुक्तपणे मोहीम राबवली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी हा मुंबईचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याची ओळख पटवल्यानंतर विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मुंबईसह रांची आणि इतर अनेक शहरांमध्ये धाडसत्र राबवून आठ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. झारखंडची राजधानी रांचीतून असहर दानिश या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. तो बोकारो जिह्यातील पेटवारचा रहिवासी आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने झारखंड एटीएस आणि रांची पोलिसांच्या मदतीने रांचीच्या लोअर बाजार परिसरातील इस्लाम नगरमधून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे जम्मू आणि कश्मीर पोलिसांच्या राज्य तपास यंत्रणेने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेच्या अमिन बाबा या फरार दहशतवाद्यासंबंधी पुलवामा आणि अनंतनाग येथे छापे घातले.