दिल्लीच्या हवेने मरतोच आहोत, आणखी फाशी कशाला? निर्भयाच्या दोषीची सुप्रीम कोर्टाकडे पुनर्विचार याचिका

supreme-court-of-india

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया प्रकरणातील एका दोषीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. पण ही याचिका दाखल करताना त्याने अजब तर्क दिल्याने ही याचिका चर्चेत आली आहे.

निर्भया प्रकरणातील एक गुन्हेगार अक्षय सिंह याने ही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. आपल्या फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करावा, असं सांगताना त्याने एक विचित्र तर्कट मांडलं आहे. दिल्ली येथील हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाचा संदर्भ देताना तो म्हणतो की, लोक जास्त काळ इथल्या हवेत जगू शकत नाहीत. दिल्ली एक गॅसचेंबर झालं आहे. इथे खूप कमी लोक आहेत, जे 80 ते 90 वर्षं वयापर्यंत जगतात. कारण इथलं प्रदूषण खूप जास्त आहे. त्यामुळे प्रदूषित हवेने मरत असताना, आणखी फाशीची शिक्षा कशाला, अशी विचारणा अक्षयने त्याच्या याचिकेत केली आहे.

अक्षयने आपल्या याचिकेत महात्मा गांधी यांच्या एका विचारांचा संदर्भही दिला आहे. गांधीजी नेहमी असं म्हणत की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्वात गरीब व्यक्तिविषयी विचार करावा. हा विचार करावा की, तुमचा निर्णय त्या व्यक्तिसाठी सहाय्यकारी असेल का? जेव्हा तुम्ही असा विचार कराल, तेव्हा तुमचा संभ्रम कमी होईल, असं अक्षयने त्याच्या याचिकेत म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या