हिंदुस्थानकडे वाकडय़ा नजरेने बघणाऱयांना सोडणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या अणुहल्ल्याच्या धमकीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला सुनावले आहे. हिंदुस्थानकडे वाकडय़ा नजरेने बघणाऱयांना सोडणार नाही, असा इशाराच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला असून हिंदुस्थानी सैन्य त्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी पीओकेमध्ये हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या कारवाईनंतर अणुहल्ल्याची धमकी दिली होती. नौदल अधिकाऱयांच्या पत्रकार परिषदेत ते मंगळवारी बोलत होते.

काय म्हणाले होते शेख रशीद

हिंदुस्थानी सैन्याच्या पीओकेमधील कारवाईनंतर पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशीद यांनी आता तोफगोळे नाही तर अणुहल्ला करण्याची धमकी हिंदुस्थानला दिली होती. यापूर्वीही राशीद यांनी हिंदुस्थानवर अणुहल्ल्याची धमकी दिलेली आहे.

आम्ही कुणाची एक इंच जमीनही बळकावली नाही

हिंदुस्थानने कधीच कुणावर हल्ला केला नाही. आम्ही कुणाची एक इंच जमीनही बळकावली नाही, परंतु जर कुणी वाकडय़ा नजरेने आमच्याकडे पाहीले तर त्यांना चोख उत्तर देण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानी सैन्याकडे असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. नौदलावर माझा पूर्ण विश्वास असून ‘26/11’ सारखा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी नौदलाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचेही संरक्षणमंत्री म्हणाले. दरम्यान, नौदल स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र तसेच युद्धनौका तयार करण्यावर भर देत असून परदेशातून शस्त्रास्त्र आयात न करण्याकडे तीनही सैन्यदलांचा भर असल्याचेही ते म्हणाले.

पाकिस्तानचे हे अप्रत्यक्ष युद्ध

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अप्रत्यक्ष युद्ध छेडले जात असल्याचे माजी सेनाप्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के सिंह यांनी म्हटले होते, मात्र गरज पडल्यास हिंदुस्थान कठोर भूमिका घेऊ शकते असेही त्यांनी म्हटले होते.

पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानने सीमेवर आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. मंगळवारी पुन्हा पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सोमवारी पाकिस्तानकडूनच सीमेवर शांतता कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले होते.