शशी थरुर रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कॉंग्रेस नेते व खासदार शशी थरुर यांना तिरुवअनंतपुरम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंदिरात तुलाभरणची पूजा करत असताना थरुर यांचा तोल गेला व ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून सहा टाके घालण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

थरुर येथील एका मंदिरात तूलाभरण पूजा करण्यासाठी आले होते. या पूजेत आपल्या वजनाएवढेच सोने, चांदी किंवा इतर वस्तू व पदार्थ देवाला दान केले जाते. यावेळी थरुर तिरुवअनंतपुरममधून निवडणूक लढवणार आहेत. यामुळे देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी, तुलाभरण पूजा करण्यासाठी ते मंदिरात आले होते. पण पूजा सुरू असतानाच त्यांचा तोल गेला व ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

थरुर यावर्षी तिरुवअनंतपुरम येथून निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या थरुर यांचा सामना यावेळी भाजप नेते आणि मिझोरमचे माजी राज्यपाल कुम्मनेम राजशेखरन आणि कम्युनिस्ट पार्टीचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सी. दिवाकरण यांच्याबरोबर आहे.