
मनमानी पद्धतीने मोदी सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी लाखो शेतकऱयांचे आंदोलन 24 दिवसांनंतरही सुरूच आहे. उत्तरेत थंडीची प्रचंड लाट आली आहे. दिल्ली आणि परिसरातील पारा 3.3 ते 3.9 अंशापर्यंत खाली घसरला आहे. हाडं गोठवणाऱया थंडीतही बळीराजा मागे हटलेला नाही. आंदोलनावर ठाम आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी राजधानी दिल्ली आणि सीमा परिसरात तापमान 3.3 ते 3.9 अंशापर्यंत नोंदविले गेले. दुपारपर्यंत धुक्याची चादर आणि थंड वारे वाहत आहे. आणखी काही दिवस थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.
दिल्लीत येणारी आणि जाणारी वाहतूक वळविली
सिंधु, टिकरी, घानसा आदी सिमांवर शेतकऱयांचे आंदोलन सुरू असल्याने राजधानी दिल्लीत येणारी आणि हरियाणा, पंजाबकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही महामार्ग बंद झाल्याने वाहतूक इतर मार्गांनी वळविली आहे. गाझिपूर सीमेवरून वाहतूक बंद आहे.
नव्या कृषी कायद्यांचा शेतकऱयांना फायदा होत आहे -पंतप्रधान
केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांचा शेतकऱयांना फायदा होताना दिसत आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘असोचेम’ या उद्योगपतींच्या संघटनेच्या कार्यक्रमात केला. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर जगलाही विश्वास आहे. उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. आत्मनिर्भर हिंदुस्थानच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असे पंतप्रधान म्हणाले.
मोदी सरकारला धक्का; माजी केंद्रीय मंत्र्यांचा आंदोलनाला पाठिंबा
भाजपनेते आणि माजी केंद्रीयमंत्री चौधरी विरेंद्र सिंह यांनी कृषी कायद्यांना विरोध करीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. हरियाणातील झज्जर जिल्हय़ातील आंदोलनात सहभागी झाले. यामुळे मोदी सरकारला झटका बसला. हे केवळ शेतकऱयांचे आंदोलन नाही तर साऱयांचे आहे. समाजातील सर्व घटकांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. मी ही दिल्लीच्या सीमेवर जाऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे विरेंद्र सिंह यांनी सांगितले.

























































