नऊ राज्यांतील 71 मतदारसंघांत आज मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक महासंग्रामातील चौथ्या टप्प्यातील प्रचार शनिवारी संपला. नऊ राज्यांतील 71 मतदारसंघांत सोमवारी मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमधील 8, मध्य प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी 6, बिहारात 5, झारखंडमध्ये 3 आणि जम्मू-कश्मीरातील 1 मतदारसंघात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 943 उमेदवार रिंगणात आहे.

शेवटच्या तीन टप्प्यांत 169 जागांसाठी मतदान

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होत आहे. 23 मे रोजी निकाल लागणार आहे. तीन टप्प्यात 303 मतदारसंघांत मतदान पार पडले आहे. चौथ्या टप्प्यांत सोमावारी 71 जागांवर मतदान होईल. उर्वरित 169 जागांसाठी शेवटच्या तीन टप्प्यांत 6, 12 आणि 19 मे रोजी मतदान होणार आहे.

मतदार याद्यांचा घोळ कायम

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र त्यानंतरही मतदार यादीतून नावे गायब होणे, व्होटिंग स्लिप घरी न पोहोचणे तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे मतदानाला मुकावे लागत आहे. या निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीतही अनेक मृत व्यक्तींची नावे आली आहेत. तर जे मतदार हयात आहेत त्यांच्या नावासमोर डिलिटचा स्टॅम्प आल्याने ते अपात्र ठरणार आहेत. अनेक मतदारांची नावे दुसऱयाच वॉर्डात आली आहेत. या सर्व घोळांमुळे बोगस मतदान होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

दिव्यांग मतदारांसाठी वाहन सुविधा

दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी वाहनाची सुविधा देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी ‘दिव्यांग मतदाराचे नाक, त्यांचा संपूर्ण पत्ता, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादीतील मतदाराचा अनुक्रमांक’ आदी तपशील लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) किंवा व्हॉट्सऍप संदेशाद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक 9372814221 किंवा [email protected] यावर पाठविल्यास वाहन नोंदणी केली जाणार आहे. तसेच याबाबत दिव्यांग मतदारांना काही अधिक माहिती हवी असल्यास त्यासाठी दिव्यांग मतदार मदत केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक 022-20820945 यावर संपर्क साधावा यापूर्वी दिव्यांगांनी या सुविधेसाठी नोंद केली असल्यास परत नोंद करण्याची आवश्यकता नाही.