IPL 2020 दिल्ली, बंगळुरूला हवाय विजय! मुंबई पहिले स्थान कायम राखण्यासाठी रणांगणात उतरणार

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने गुरुवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सला हरवले आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले ऑफमधील स्थान निश्चित झाले. चेन्नई सुपरकिंग्जने या मोसमातील समीकरणे बदलली.

आता आज होणाऱया दोन्ही लढती प्ले ऑफसाठीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरणार आहेत. मुंबई इंडियन्स-दिल्ली पॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज खडाजंगी होणार आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या स्थानावर कायम राहण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. दिल्ली कॅपिटल्सला मात्र आठव्या विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जिंकावेच लागणार आहे. सनरायझर्स हैदराबादला मात्र जरतरच्या समीकरणावर अवलंबून राहावे लागणार आहे.

गतविजेता संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिलाच

चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला हरवले आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले. प्ले ऑफमध्ये पोहोचणारा गतविजेता मुंबई इंडियन्स पहिलाच संघ ठरलाय. मात्र उर्वरित दोन्ही लढतींमध्ये विजय मिळवून पहिल्या स्थानावर कायम राहण्यासाठी हा संघ प्रयत्न करील यात शंका नाही. या संघाने एका लढतीत विजय मिळवला तरी त्यांना पहिल्या स्थानावर कायम राहता येणार आहे.

विजयानंतरही हैदराबादला वाट बघावी लागणार

कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पाच लढतींमध्ये विजय मिळवला आहे. आता त्यांना पुढील दोन लढतींमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स या दोन तगडय़ा संघांचा सामना करावयाचा आहे. या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचे असल्यास त्यांना दोन्ही लढतींमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. याचसोबत राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली पॅपिटल्स यांच्या लढतींच्या निकषावरही त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. एपूणच काय तर स्वतःच्या कामगिरीसह इतरांची कामगिरी त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे.

विराटच्या ब्रिगेडची प्रतीक्षा

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 12 लढतींमधून सातमध्ये विजय मिळवत 14 गुणांची कमाई केलीय, पण त्यांचे प्ले ऑफमधील स्थान अजून पक्के झालेले नाही. त्यांना किमान एका विजयाची आवश्यकता आहे. सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली पॅपिटल्स यांच्याविरुद्धच्या लढतींमध्ये विजय मिळवल्यास हा संघ अव्वल दोनमध्ये राहू शकतो. पण दोन्ही लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यास त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

पाँटिंगच्या संघाची प्ले ऑफसाठी झुंज

प्रशिक्षक रिकी पाँटिंग व कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या दिल्ली पॅपिटल्सने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी केली, मात्र यानंतर सलग तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश अजून निश्चित झालेला नाहीए. मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यापेक्षा त्यांचा नेट रनरेट कमी आहे. पण उर्वरित दोन लढतींमधील फक्त एका लढतीत जरी विजय मिळवला तरी दिल्ली पॅपिटल्सला पुढल्या फेरीत पोहोचता येणार आहे. पण दोन्ही लढतींमध्ये हार सहन करावी लागल्यास इतर संघांच्या कामगिरीवर त्यांना नजर ठेवावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या