Oh No!..YES बँकेला घरघर ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातल्या अग्रगण्य खासगी बँकांपैकी एक असलेली येस बँक डबघाईला आल्याचे वृत्त आहे. पंधरा वर्षांपूर्वी देशात सुरू झालेल्या येस बँकला घरघर लागली असून वर्षभरात या बँकेतील गुंतवणूकदारांचे 90 टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे  बोलले जात आहे.

ऑगस्ट 2018 मध्ये येस बँकेच्या एका समभागाचे मूल्य 400 रुपयांपेक्षा अधिक होते. ते आता घसरुन 32 रुपयांपर्यंत खाली आले आहे. याचा थेट परिणाम बँकेच्या बाजारमूल्यावर झाला आहे. येस बँकेचे व्यवहार आज 8,161 कोटी रुपयांवर येऊन थांबले आहेत. सप्टेंबर 2018 साली यस बँकेची मार्केट कॅप जवळ जवळ 80 हजार कोटी रुपयांची होती. पण सद्यस्थितीत मार्केट कॅपमध्ये 70 हजार कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून येस बँकेला एकामागोमाग एक झटके बसत आहेत. यात सर्वात मोठा झटका आरबीआयकडून  बसला आहे. येस बँकचे बुडीत कर्ज आणि ताळेबंदाबद्दल योग्य माहिती देण्यास सहकार्य करत नसल्याचा आरोप आरबीआयने केला होता. त्यानंतर आरबीआयने बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांना पदावरून हटवले. तसेच आरबीआयने येस बँकेवर अनेक निर्बंधही लावले. काही दिवसांपू्र्वी येस बँक स्विफ्ट मेसेजिंग सॉफ्प्टवेअरशी संबंधित सूचनांचे पालन करत नसल्याचे सांगित आरबीआयने या बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. क्यूआयपीने बँकेतील ठेवींसाठी जे लक्ष्य दिले होते तेही बँकेला पूर्ण करता आले नव्हते. येस बँकेतील या गोंधळावर देशातील उद्योगजगताचे तसेच सामान्य गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. यामुळे येस बँकेबाबत नकारात्मक चर्चाही रंगायला लागल्या आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये मानांकन संस्था मूडीजने येस बँकेचे पतमानांकन कमी केले होते. यामुळे बँकेच्या शेअरवरही याचा परिणाम झाला.

बँकेचे पतमानांकन घसरल्याने खराब कामगिरी असणाऱ्या जगातील दहा टॉप बँकांच्या यादीत येस बँकेचे नाव सामील झाले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात या दहा टॉप बँकांतील सात बँका या हिंदुस्थानमधील असून त्यात येस बँकेचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले होते.