ठाणे स्थानकात ‘नवा’ प्रवासी; वनरुपी क्लिनिकमध्ये महिलेची प्रसूती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, ठाणे

टिटवाळा येथून सायन रुग्णालयात प्रसूतीसाठी निघालेल्या 21 वर्षीय महिलेची ठाणे रेल्वे स्थानकातील वन रूपी क्लिनिकमध्ये प्रसूती झाली. या महिलेने गोड चिमुकल्याला जन्म दिला असून मुलासह त्याची आईदेखील सुखरूप आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात ‘नवजात’ प्रवासी जन्माला आल्याच्या गोड बातमीने क्लिनिक व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

टिटवाळा येथे राहणाऱ्या इर्शात शेख (21) या कुटुंबीयांसह रुग्णालयात प्रसूतीसाठी टिटवाळा जलद लोकलने सायन रुग्णालयात जात होत्या. डोंबिवली सोडल्यानंतर त्यांना अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. यावेळी आरपीएफ हेल्पलाईनवरून ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयात शेख कुटुंबीयांनी माहिती दिली. त्यामुळे उपप्रबंधक आर. के. दिवाकर, मनीषा पाटले यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस वर्षा मदणे यांच्यासह फलाटावर धाव घेतली. लोकल सायंकाळी 6.15 वाजता फलाट क्रमांक सहाला येताच इर्शात यांना या कर्मचाऱ्यांनी स्टेचरवरून ठाणे रेल्वे स्थानकातील कनरुपी क्लिनिकमध्ये उपचारार्थ दाखल केले. तेथे सहा वाजून 35 मिनिटांनी इर्शात यांची प्रथमोपचार केंद्रातील डॉक्टर राठोड, लतिका कोतकाल, परिचारिका कोमल आणि भावना यांनी सुखरूप प्रसूती केली. त्यानंतर मायलेकांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

तिसऱ्यांदा टॅह्या…टॅह्या..
रेल्वे स्थानकातील अपघातात जखमी होणाऱ्या प्रवाशांवरील प्रथमोपचारासाठी वनरुपी क्लिनिक सुरू केले आहे. मात्र हे क्लिनिक सुरू झाल्यापासून येथे आतापर्यंत ही तिसरी सुखरूप प्रसूती असल्याची माहिती प्रथमोपचार केंद्राचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली. त्यामुळे जखमी प्रवाशांसह गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी हे वनरुपी क्लिनिक वरदान ठरले आहे.