दिल्लीहून बिहारला फिरायला गेलेल्या महिलेला Airtel ने पाठवले 1 लाख रुपयांचे इंटरनॅशनल रोमिंग बिल

टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानी कराभाराचा नाहक त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो. आणि अशा अनेक घटना देशभरात घडत असतात. नेटवर्क गायब होणे, अचानक कॉल ड्रॉप होणे, अव्वाच्यासव्वा बिल येणे अशा समस्यांचा ग्राहकांना नेहमीच सामना करावा लागतो. अशीच एक घटना दिल्लीतील एका तरुणीसोबत घडली आहे.

दिल्लीची रहिवासी असणाऱ्या लेखिका नेहा सिन्हा फिरण्यासाठी बिहारला गेल्या होत्या. त्यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान त्यांना मोबाईलचे बिल आले तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण एअरटेलने (Airtel) नेहा यांना इंटरनॅशनल रोमिंगचे कारण देत 1 लाख रुपयांचे बिल पाठवले होते. इतकंच नाही तर कंपनीने त्यांच्या मोबाईलची सेवाही बंद केली. अचानक सेवा बंद नेहा बिहारमधील एका भागात अडकल्या होत्या.

एक्स ‘x’ या साोशल मिडीया माध्यामावर नेहा यांनी आपला अनुभन मांडताना म्हटले की, “हा एक मोठा घोटाळा आहे! मी वाल्मिकी नगर बिहार येथे आहे. एअरटेल इंडियाने मला 1 लाख रुपयांपेक्षा अधिक रोमिंग बिल पाठवले आहे. मी हिंदुस्थानच्या भूमीवर असून मी हिंदुस्थानी नागरीक आहे. कोणतीही सूचना न देता एअरटेल कंपनीने माझी मोबाईल सेवा बंद केली, ज्याचा मला त्रास होतोय.”

नेहा यांनी आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. नेहा यांनी म्हटले की, “अशी अचानक सेवा बंद केली तर महिलांच्या सुरक्षततेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.”

नेहा यांनी जेव्हा एअरटेलशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडून मिळालेले उत्तर निराशाजनक होते. त्या म्हणाल्या की, मी जेव्हा एअरटेलशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की आम्ही काहीही करु शकत नाही. कारण, ‘सिस्टम’ मधून लॉग इन झाले आहे. यावर नेहा यांनी संतापून प्रश्न विचारला की “सिस्टम म्हणजे देव आहे का? अशी कोणती सिस्टीम आहे जी लोकांना त्रास देण्याचे काम करते?” एअरटेलने नेहा यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांची माफी मागितली आणि त्यांची सेवा पुर्ववत करून दिली.