
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या देवरुखमध्ये विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांसाठी पंचायत समितीजवळ निवारा शेड उभारण्याचे प्रयत्न झाले नाहीत, मात्र सामाजिक जाणिवेतून लायन्स क्लबने येथे शेड उभारली. याच शेडवर मे महिन्यात झालेल्या चक्रीवादळात वडाचे मोठे झाड कोसळले. त्यामुळे ही शेड पडून नुकसान झाले आहे.
ही शेड दुरुस्त करण्यासाठी किरकोळ निधीची आवश्यकता असून हा निधी नगरपंचायतीने उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी समविचारी मंचचे तालुकाध्यक्ष मनोहर गुरव यांनी केली आहे. परिसरात अशा अनेक शेड असून काही नादुरुस्त तर काहिंचा वापर चक्क दुकानांसाठी केला जात आहे. काही शेड जमीनदोस्त करून तिथे खुलेआम गाळे बांधण्यात येत आहेत. याबाबतीत समविचारीचे प्रमुख बाबासाहेब ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, महासचिव श्रीकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गुरव यांनी दिली.


























































