
सामना प्रतिनिधी । बीड
ग्रामीण आणि शहरी भागातील ब्राह्मण समाजाची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे. शिक्षणासाठी पैसा नाही, उच्च शिक्षण घेऊन गुणवत्ता असूनही नोकरी नाही. नोकरी नसल्याने लग्न होत नाही. यामुळे ब्राह्मण समाज संकटात सापडला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाज आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी समाजाच्या सर्व संघटना एकत्र येत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्यानंतर आता ब्राह्मण समाजाला ही आरक्षण हवे आहे. ब्राह्मण समाजाच्या आरक्षण मागणीचा जोर वाढत आहे. त्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाच्या सर्व संघटना एकवटणार आहेत. ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे कारण हा बुद्धिमान समाज योग्य संधी नसल्याने संकटाचा सामना करत आहे. शेती राहिली नाही, नोकऱ्या मिळत नाही, हाताला काम नाही, उपजीविकेचे साधन नाही, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही, जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना या शिक्षणाचा कोणताच फायदा होत नाही. नोकरी लागत नसल्याने विवाह जुळून येत नाहीत. गावागावात अविवाहित आणि वय उलटून गेलेल्या युवकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातील ब्राह्मण समाज हलाखीचे जीवन जगत आहे. आर्थिक सुबत्ता नसल्याने समाजाला अपमानित व्हावे लागत आहे. सामाजिक आणि आर्थिक गर्तेत सापडलेल्या ब्राह्मण समाजाच्या मुलांचा आत्मविश्वास कमी होत आहे. बुद्धिमत्ता असूनही ब्राह्मण युवक प्रवाहाबाहेर गेला आहे. समाजाची अधोगती रोखण्यासाठी ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे या मागणीसाठी समाज एकत्र येत आहे. एक चळवळ निर्माण होत आहे ब्राह्मण समाजातील सुस्थितीत असणाऱ्या कुटुंबानीही आपल्या बांधवांच्या मागणीसाठी या चळवळीत सहभाग नोंदवून दबावगट निर्माण करावा असे आवाहन विविध संघटनांनी केले आहे.

































































