गांधीनगरमधील चोऱ्यांसह वाहतूककोंडीवर उपाय करा, शिवसेनेचे करवीर पोलिसांना निवेदन

गांधीनगरमधील वाढत्या चोऱ्या रोखण्यासह वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सहायक फौजदार महादेव बुगडे यांनी स्वीकारले.

यावेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, दीपक रेडेकर, दीपक पोपटाणी, योगेश लोहार, जितू कुबडे, दीपक अंकल, सुनील पारपाणी, अजित चव्हाण, बाबूराब पाटील, जितू चावला आदी उपस्थित होते.

गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून 140पेक्षा जास्त झालेल्या चोऱयांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. उचगाव पैकी मणेरमळा येथील मंदिरातील चोरीचे फुटेज मिळूनही चोर सापडले नाहीत. चोरीचे वाढते प्रकार पाहाता गांधीनगर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तपास लागत नसल्याने चोरटय़ांचे धाडस वाढले आहे.

तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत आणि उचगाव उड्डाणपुलाखाली वाहतुकीच्या कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावर पोलीस असतात; पण वाहतूककोंडी कायम आहे. गांधीनगर पोलिसांचे वाहतूक कोंडीपेक्षा दंडात्मक कारवाईकडे जास्त लक्ष असते. पोलिसांच्या कारवाईमुळे ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे याबाबत व्यापारी आणि पोलिसांची एकत्रित बैठक बोलावून यातून मार्ग काढावा. तसेच वाहतुकीला शिस्त न लावल्यास ‘शिवसेना स्टाइल’ने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.