
काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी भाजप प्रवत्ते प्रिंटो महादेवनने दिली आहे. हे अत्यंत गंभीर व चिंताजनक असून या प्रकरणी प्रिंटो यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. राहुल गांधी व कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केली आहे.
राहुल गांधी हे समाजातील वंचित, मागास, आदिवासी व अल्पसंख्याक समाजाच्या रक्षणासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. सामाजिक न्याय, एकता व बंधुत्वाची भाषा ते करतात.गांधी कुटुंबाला नेहमीच धोका राहिलेला आहे. आता तर गोळ्या घालण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून याचे गांभीर्य पाहता राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांची सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. अशा गुन्हेगारावर गंभीर कारवाई करा आणि लोकशाहीत अशा कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा कडक संदेश द्या. तसेच लोकप्रतिनिधींना निर्भयपणे त्यांचे कर्तव्य पार पाडता आले पाहिजे, असे नसीम खान यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.





















































