
दाखल गुह्यात मदत करण्याबरोबर दुसऱ्या गुह्यात न अडकविण्यासाठी विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षकाने एक लाखाची लाच मागितली. याबाबत तक्रार येताच अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचला. मात्र तक्रारदाराकडून 25 हजार घेतल्यावर ट्रॅप लागल्याची कुणकुण लागताच एक अंमलदार त्याच्या गाडीतून पळून गेला. याप्रकरणी महिला उपनिरीक्षकासह अंमलदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री लोंढे असे महिला उपनिरीक्षकाचे तर जयप्रकाश माळी असे पोलीस अंमलदाराचे नाव आहे. यातील तक्रारदार व त्याच्या मित्राविरोधात विनोबा भावे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुह्याच्या तपास अधिकारी जयश्री लोंढे यांनी त्या दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानुसार दोघे पोलीस ठाण्यात गेले असता लोंढे यांनी एक लाखाची लाच मागितली. त्यावेळी लेंढे यांना 15 हजार देण्यात आले, मात्र लोंढे यांनी दोघांचेही मोबाईल जप्त केले व उर्वरित पैसे दिल्यावर मोबाईल देईन असे सांगून त्यांना पाठवून दिले. लाच द्यायची नसल्याने समीरने अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली होती.