देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या देवनार डंपिंग ग्राऊंडवर वीजनिर्मिती करण्याची प्रतीक्षा तब्बल सात वर्षांनी संपणार आहे. या ठिकाणी दररोज 600 मेट्रिक टन कचऱयावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार असल्यामुळे मुंबईतील कचऱयाच्या विल्हेवाटीचा प्रश्नही सुटणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीत मंजुरी दिली. दरम्यान, या प्रस्तावात प्रशासनाने जाणीवपूर्वव फेरफार केल्याचा आरोप करीत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी संशय व्यक्त केला.

पालिकेचे देवनार डंपिंग ग्राऊंड सुमारे 12 हेक्टर जागेवर विस्तारलेले आहे. या ठिकाणी कचऱयापासून वीजनिर्मिती करण्याची योजना 2013 सालापासून राबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कामासाठी निविदा भरल्यानंतर पात्र ठरलेल्या मे. चेन्नई एमएसडब्ल्यू प्रा. लि. आणि मे. सुएज एनव्हायरमेंट इंडिया प्रा.लि. कंत्राटदारांपैकी चेन्नई प्रा.लि. कंत्राटदाराने अंतिम प्रक्रियेत (सी-पॅकेट) कामाची किंमतच भरली नसताना त्याला तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी पुन्हा बोलावून 173 कोटींनी कमी रकमेची ऑनलाईन नोंद करण्याची मुभा दिली. ही कृती म्हणजे मर्जीतील कंत्राटदाराला संधी देण्यासाठी केलेला प्रकार असल्याचा आरोप करीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी उपसूचना मांडून प्रक्रियेत पहिल्यांदा पात्र ठरलेल्या सुएज इंडिया प्रा.लि.ला काम देण्याची मागणी लावून धरली. या वेळी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनीदेखील उपसूचनेला पाठिंबा देत पहिल्यांदा रीतसर टेंडर प्रक्रियेनुसार रक्कम नोंद केलेल्या सुएज इंडिया प्रा.लि.ला काम द्यावे, अशी मागणी लावून धरली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचऱयापासून वीजनिर्मिती करण्याचे काम मे. सुएज एनव्हायरमेंट इंडिया प्रा.लि.ला देण्याचा प्रस्ताव उपसूचनेच्या धर्तीवर मंजूर केल्याचे जाहीर केले.

न्यायालयात मुंबईकरांच्या हिताची बाजू मांडा

गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव रखडत असतानाच पालिकेने 22 फेब्रुवारीपर्यंत याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे न्यायालयात बाजू मांडताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेने न्यायालयात बाजू मांडताना स्थायी समितीने कचऱयाची विल्हेवाट आणि मुंबईकरांच्या हितासाठी प्रस्ताव मंजूर होणे निवडीचे असल्यामुळे मंजुरी दिल्याचे सांगत बाजू मांडावी, असे आवाहनही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला केले.