80 हजाराची ‘अॅडवान्स लाच’ घेताना पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील देवनार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला 80 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री अटक केली. एका गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष सुटका होण्यासाठी मदत करतो असे सांगत या पोलीस निरिक्षकाने तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. दत्तात्रय गोविंद चौधरी (50) असे त्या पोलीस निरिक्षकाचे नाव आहे.

या प्रकरणातील फिर्यादी हा आरोपी असून त्याच्या भावावर व मित्रांवर देखील गुन्हे दाखल आहे. त्यांना न्यायालयाकडून अंतरिम जामीन देखील मंजूर झालेला आहे. मात्र चौधरी यांनी फिर्य़ादीला या प्रकरणात निर्दोष सुटण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली मात्र त्या बदल्यात तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून ते अडीज लाख रुपयांवर तयार झाले. मात्र फिर्यादीला लाच द्यायची नसल्याने त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळविले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून चौधरी यांना या प्रकरणातील 80 हजार रुपयांचे अॅडवान्स घेताना रंगेहाथ पकडले.