देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांची धूम आहे. पंतप्रधान मोदी आणि देशातील बडे नेते महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत. मात्र बारामती मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार कुठेही दिसले नाहीत. यासंदर्भात आता चर्चांना उधाण आलं असून समर्थकांनी शोधाशोध सुरू केली आहे.
बारामतीमधील मतदानाआधी अजित पवार दररोज प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधायचे आणि प्रचारसभांना देखील हजेरी लावायचे. मात्र मतदानानंतर ते ‘नॉट रिचेलब’ झाल्यानं समर्थक बुचकळ्यात पडले आहेत.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यातील कोणत्याही कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहिल्याचं दिसलं नाही. आता यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. खुद्द शरद पवार यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
मोदींच्या बुधवारच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. बुधवारी दिंडोरीतील सभेमध्ये अजित पवारांऐवजी छगन भुजबळ उपस्थित होते तर कल्याणमधील सभेला सुनील तटकरेंनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मात्र अजित पवार कुठेही दिसले नाहीत.
अजित दादांच्या टीमने अजित पवार दोन दिवसांपासून कुटुंबीयांसोबत बाहेर आहेत, अशी माहिती दिली. तर त्यांचे स्वीय सहायक असलेल्या मुसळे यांनी, ‘अजित पवार कुठे आहेत ते देवगिरी बंगल्यावर विचारा तिथे कळू शकेल’, असं म्हटल्याचं झी 24 तासच्या वृत्तात म्हटलं आहे. शरद पवार यांना अजित पवारांसंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी, ‘अजित पवार खरंच आजारी आहेत’, असं उत्तर दिलं. त्यामुळे समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे.