
31 मार्चपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली, मात्र उद्यापासून कठोर निर्णय घेतला जाणार आहे. वेळ पडली तर ज्यांना काढून टाकले आहे त्यांना बडतर्फ करून त्यांच्या जागी नवीन भरती होऊ शकते, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 10 तारखेला पगार देण्याचे कबूल केले आहे, असेही ते म्हणाले.
विलीनीकरणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, विलीनीकरण होऊ शकत नाही असा तीन अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल आला असून तो सरकारने स्वीकारला आहे. मात्र अहवालातील अनेक गोष्टी पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न केला असून पगारही पूर्वीच्या तुलनेमध्ये वाढवला आहे. कोर्टाने 5 तारखेपर्यंत कारवाई नको असा आदेश दिल्याचे विचारताच अजित पवारांनी न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे यात प्रश्न नाही असे म्हटले. न्यायव्यवस्थेने सांगेपर्यंत काही होणार नाही, परंतु एकदा ती मुदत संपल्यावर पुढे कठोर कारवाई करण्याचा अधिकार निवडून दिलेल्या मंत्रिमंडळाला असतो असेही ते म्हणाले.
निर्बंधमुक्तीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील
कोरोना निर्बंधांची नियमावली बऱ्याचअंशी शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, असे अजित पवार म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्र निर्बंधमुक्त होणार का याबाबत चार वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होईल. मुख्यमंत्री यासंबंधी टास्ट फोर्सशी बोलतील, डब्ल्यूएचओकडूनही माहिती घेतील आणि केंद्राच्या सूचना, नियमांची माहिती घेऊन जनतेच्या हिताचे निर्यम घेतील, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. तसेच गुडी पाडव्याच्या शोभायात्रा आणि नियमावलीबाबतही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.
चुकीचा समज पसरवला गेला
आमदारांना देण्यात येणाऱ्या घराबाबत चुकीचा समज पसरवला गेला. म्हाडामध्ये जसे आरक्षण असते तसे ज्या आमदारांकडे घरे नाहीत त्यांच्याकडून पैसे घेऊन घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र प्रसारमाध्यांनी घरे मोफत वाटत असल्याची आवई उठवली, असे अजित पवार म्हणाले. तसेच शरद पवार यांनीही याबाबत विधान केले असून तीच आमच्या पक्षाची भूमिका असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवरच चर्चा जास्त
मशिदींवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा भाजपने उठवल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, शेवटी कोणी कोणता मुद्दा हाती घ्यायचा हा ज्याचा त्याचा अधिकारी आहे. सरकार म्हणून कोणी काम करत असेल तर त्याबाबत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जे काही सांगेल त्याची अंमलबजावणी करावी लागते. एखादा मुद्दा पटला नाही तर खंडपीठापुठे अपीलही करू शकतो. याबाबत माहिती घेून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही अशी पावले उचलू. सरकारच्या पातळीवरही काही निर्णय होतील, असे ते म्हणाले. तसेच अलीकडच्या काळामध्ये विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर चर्चा होते. परंतु जातीय सलोखा राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न करावे, सर्व राजकीय नेत्यांनीही तीच भूमिका मांडण्याचे काम करायला हवे. 21 व्या शतकात जग कुठला विचार करतेय आणि आपण जनतेला कोणत्या विषयामध्ये गुंतवून ठेवतोय याचेही आत्मचिंतन व्हायला हवे, जनतेनेही याचा गांभिर्याने विचार करायला हवे, असेही अजित पवार म्हणाले.






























































