अंगडिया खंडणी प्रकरण भोवले; उपायुक्त सौरभ त्रिपाठी सेवेतून निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगडीया खंडणी प्रकरणात आरोपी असलेले उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात राज्य शासनाने अखेर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तिघा अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कामावर गैरहजर असलेल्या त्रिपाठी यांना सेवेतुन निलंबित करण्यात आले आहे.

भुलेश्वर येथील पोफळवाडीतील अंगडीयांना आयकर विभागाच्या कारवाईची भिती दाखवत लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या तिघा अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळली होती. याप्रकरणी अंगडियांनी तक्रार केल्यानंतर अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी चौकशी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तिघा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

हा गुन्हा दाखल होताच त्या परिमंडळाचे तत्कालिन उपायुक्त सौरभ त्रिपाठी हे वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता तडकाफडकी रजेवर गेले. दरम्यान, त्रिपाठी यांची परिमंडळ 2 वरून उपायुक्त अभियानपदी बदली केली होती. पण त्रिपाठी तेथे अद्याप हजर झालेच नाही. गुन्हा दाखल होऊन तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अटक होऊन महिना लोटला तरी त्रिपाठी कामावर रुजू झाले नाही. असे असतानाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणी उकळल्याची तक्रार करणाऱ्या अंगडिया आसोशिएशनच्या काही सदस्यांवर त्रिपाठी दबाव टाकत होते. ही गंभीर बाब समोर आल्यानंतर त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठवला होता.

राज्य शासनाने या प्रस्तावाची गंभीर दखल घेत कामावर गैरहजर राहणारे व अंगडिया असोसिएशनच्या काही सदस्यांवर दबाव टाकणारे सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आता बुधवारी त्रिपाठी यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यांचा जामिन अर्ज फेटाळला जातो की मान्य करण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच गुन्हे शाखा सौरभ त्रिपाठी यांचा कसून शोध घेत आहेत.