
सामना प्रतिनिधी । कुडाळ
आवळेगांव पंचक्रोशीत शिवसेनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहे. पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द आहोत अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी आवळेगांव येथे दिली.
आवळेगांव येथील श्री देव नारायण मंदिर येथे खा. विनायक राऊत यांच्या स्थानिक निधीतून हायमास्ट टॉवर उभारणे, आवळेगांव हायस्कूल येथे पिण्याच्या पाण्याची सिंचन विहीर खोदणे, डोंगरी विकास निधीतुन आवळेगांव जि.प.शाळा क्रं. 1 येथे सभा मंडप बांधणे व जिल्हा वार्षिक नियोजनमधुन आवळेगांव – किनळोस रस्ता डांबरीकरण करणे अशा विविध विकास कामांचा शुभारंभ रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. हि सर्व विश्राम कामे मंजुर केल्याबद्दल शिवसेना खा. विनायक राऊत, पालकमंत्री ना. दिपक केसरकर, आ. वैभव नाईक यांचे आवळेगांव ग्रामस्थांनी आभार मानले. दरम्यान आ. नाईक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नाईक म्हणाले जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. आवळेगांव मध्ये शिवसेनेच्या माध्यमातुन विकासकामे केली जात आहे. यापुढेही या भागातील विविध प्रश्न मार्गी लागुन सर्वांगीण विकास साधण्यास शिवसेना कटीबध्द आहे. जि.प.गटनेते नागेंद्र परब यांनी यापुढेही आवळेगांवात सर्वांच्या सहकार्याने विकासाची गंगा आणणार असल्याचे यावेळी सांगितले. पं.स.सदस्या शितल कल्याणकर, माजी सरपंच राजेंद्र सावंत, महेश सावंत आदींसह ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
या विकासकामांची आवळेगांव ग्रामस्थांनी जि.प.सदस्य नागेंद्र परब यांच्याकडे मागणी केली होती. ती मंजुर झाल्याने श्री.परब यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आ. नाईक यांचे आवळेगांव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रशांत सावंत व सचिव के.एम. सावंत यांनी आभार मानले.




























































