डेटा लीकप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची आज पोलीस चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेटा लीक प्रकरणात मुंबई सायबर पोलीस आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी फडणवीस यांना बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात उद्या रविवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे फडणवीस यांची चौकशी होणार आहे. मात्र पोलीस अधिकारी माझ्या घरी येऊन जबाब घेतील, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांनी फोन करून ही माहिती दिल्याचे फडणवीस यांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून मात्र याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.

राज्य गुप्तवार्ता विभागाने डेटा लीक प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात फडणवीस यांना लेखी प्रश्नावली पाठवली होती. मात्र फडणवीस यांनी पोलिसांना त्या प्रश्नांची उत्तरे पाठवली नाही. त्यामुळे पोलिसांनी फडणवीस यांना शुक्रवारी नोटीस पाठवली.

 पाच वर्षे माझ्याकडे गृहमंत्रीपद होते. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र मी विरोधी पक्षनेता असल्याने मला विशेषाधिकार आहेत. एखादी माहिती माझ्याकडे कशी आली याची विचारणा पोलीस माझ्याकडे करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. फडणवीस यांनी पुण्यातील आपले उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.